लोकशाही समर्थकांच्या विरोधात ड्रोन अन् स्पायवेअरचा वापर
वृत्तसंस्था/ यंगून
म्यानमारमध्ये लोकशाहीवादी सरकारला सत्तेवरून हटविण्याच्या घटनेला महिना पूर्ण झाला आहे. सैन्याच्या दडपशाहीनंतरही लोकशाही स्थापन करण्याची मागणी करणारे निदर्शक मागे हटण्यास तयार नाहीत. म्यानमार सैन्याच्या गोळीबारात आतापर्यंत 25 जण मारले गेले आहेत. सीमांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्राप्त तंत्रज्ञानाचा वापर आता आंदोलन चिरडण्यासाठी म्यानमारचे सैन्य करत आहे.
चीनच्या सैन्याने हाँगकाँग आणि शिनजियांगमध्ये लोकशाही समर्थकांचा आवाज दडपण्यासाठी याच हेरगिरी उपकरणे आणि घातक अस्त्रांचा वापर केला होता आणि आताही करत आहे.
इस्रायली ड्रोन अन् स्पायवेअर
म्यानमारचे सैन्य इस्रायली टेहळणी ड्रोन, युरोपियन आयफोन क्रॅकिंग उपकरण आणि हॅकिंगकरता उपयुक्त ठरणाऱया अमेरिकेत निर्मित सॉफ्टवेअरचा वापर करत आहे. टेलिकम्युनिकेशन अपग्रेडिंगच्या माध्यमातूनही आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच्या मदतीने देशातील हत्यासत्र जगापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यात येत आहे. तंत्रज्ञानाच्या वापरासह सैन्याने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप होत आहे.
सैन्यसामग्रीचा पुरवठा
इस्रायलने 2018 मध्ये म्यानमारला सैन्यसामग्री विकण्यास बंदी घातली होती. तेव्हा म्यानमारच्या सैन्यावर रोहिंग्यांच्या नरसंहाराचा आरोप झाला होता. तरीही धोकादायक शस्त्रास्त्रs आणि टेहळणी तंत्रज्ञान म्यानमारच्या सैन्याला उपलब्ध झाले आहे. हे सर्व कुठल्या मार्गाने म्यानमारमध्ये पोहोचले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.