प्रतिनिधी / जयसिंगपूर
गुटख्याच्या बॅगा चोरल्याच्या संशयातून अमानुष मारहाण केल्याने मृत्यू झालेल्या तरुणाच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा जणांना ताब्यात घेतले असून, यातील सहभागी अन्य चौघा जणांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती जयसिंगपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. या घटनेत दानोळी (ता. शिरोळ) येथील अर्जुन नामक तरुणाचा मृत्यू झाला असून, दोघांची प्रकृती गंभीर असल्याचेही ते म्हणाले.
यासंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, टुमकूर ते अथणी या मार्गावर गुटख्याची वाहतूक आयशर कंटेनरमधून करण्यात येत होती. दरम्यान, हा गुटख्याचा कंटेनर अथणीकडे येत असताना कंटेनरमध्ये असलेल्या 144 बॅगांपैकी 53 बॅगांची चोरी झाल्याचे उघडकीस आले. ही चोरी या कंटेनरमधून गुटख्याची वाहतूक करणाऱया चांदपाशा सनाऊल्लाह व नरसिंह मूर्ती (वय 28, रा. बसवाण्णा आळी, ता. निलमंगळा, बेंगळूर) व त्यांचा मित्र अर्जुन (पूर्ण नाव समजू शकले नाही) या तिघांनी चोरल्याचा संशय इमरान अल्ताफपाशा (वय 32, रा. चिकबाणावर, बेंगळूर), अश्रफअली उस्मानअली (वय 38, सतरंजीपुरा, नागपूर) व साजिद पठाणी (मूळ रा. मुंबई, सध्या रा. अप्सरा हॉटेलजवळ, मिरज) यांना आला. त्यामुळे या गुटख्याच्या बॅगांची चौकशी करण्यासाठी तिघांनाही अथणी येथील एका गोडावूनमध्ये आणण्यात आले. त्याठिकाणी या तिघांनाही अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर इनोव्हा गाडीत घालून त्यांना मिरज येथे आणण्यात आले.
तेथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेऊन पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली. व गुटख्यांच्या बॅगांबद्दल चौकशी केली. पण तिघा जणांकडून त्याबद्दल सांगण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या इमरान अल्ताफपाशा आश्रफअली व साजिद पाठनी यांनी नृरसिंहमूर्ती, चांदपाशा सनाउल्लाह व अर्जुन यांना शिरोळ येथील फार्म हाऊसवर आणण्यात आले. त्याठिकाणी त्यांना पुन्हा बेदम मारहाण करून बॅगा चोरीची कबुली देण्यासाठी दबाव आणला. यावेळी या मारहाणीत संशायित महेश बजरंग दळवी (रा. दानोळी), अभिनंदन उर्फ अभ्या राजकुमार धडेल (रा. कोथळी), भरतेश सिद्राम कुडचे (रा. नदीवेश, मिरज), महंमद जुनेद अब्दुलगफार दिवाण (रा. शांतीनगर, इगतपुरी, नागपूर) व रणजित प्रकाश मिसाळ (रा. नदीवेश, मिरज) यांनीही त्यांना मारहाण केली. ही घटना सोमवार 21 रोजी घडली. या मारहाणीत अर्जुन याचा मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले.
दरम्यान, अर्जुन याचा मारहाणीत मृत्यू झाल्याने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय या दहा जणांनी घेतला. मात्र तत्पूर्वीच या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलासंनी सर्वत्र नाकाबंदी केली. मंगळवारी रात्री अंकली टोलनाक्मयाजवळून हा कंटेनर कर्नाटककडे जात होता. त्यावेळी पोलिसांनी कंटेनर अडवून त्याची झडती घेतली असता त्यात मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तातडीने हालचाल करून शेख जुबेर अहमद, इमरान अल्ताफ, आश्रफअली, उस्मानअली, भरतेश सिद्राम कुडचे, मोहमद जुनेद अब्दुलगफार दिवाण, रणजित मिसाळ या सहा जणांना ताब्यात घेतले. तर अन्य चौघेजण फरारी झाले. यावेळी पोलिसांनी कंटेनर, इनोव्हा कार ताब्यात घेतली. यातील अटक केलेल्या सहा जणांना जयसिंगपूर येथील न्यायालयात उभे केले असता त्यांना 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
गुटखा बॅगा चोरीची कबुली देण्यासाठी लाकडी दांडके, हॉकी स्टीक, चाकू, लाल मिरचीचे पाणी, पेट्रोल तसेच इलेक्ट्रीक वायर यांचा वापर करून त्यांना अमानुष मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या सर्वांना तीन दिवस उपाशी ठेवून हे अत्याचार केल्याचे किशोर काळे यांनी सांगितले. हे सहाही जण सराईत गुन्हेगार असल्याची माहिती त्यांनी दिली.
खुनाचा गुन्हा लपविण्यासाठी दोन लाखाचे आमीष
चोरीतील संशयित अर्जुन ठार झाल्यानंतर गुह्यातील पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने संशयित आरोपीने संगनमताने फौजदारी पात्र कटाची आखणी करून यातील जखमी झालेल्या नुर्सिंहमूर्ती याला 2 लाख रुपयेचे आमिष दाखवून हा खुनाचा गुन्हा आपले वर घेण्यास जबरदस्ती केले. व अर्जुनचा मृतदेह दानोळी मधून अथणीकडे कंटेनर मधून घेऊन जाऊन अथणी येथील गोडावून मध्ये ठेवूय , त्यानंतर तु टूमकूर येथे जाऊन अर्जुन यानेच कंटेनर मधील 53 गुटख्याच्या बॅगांची चोरी केल्याचे सांगून त्याला मारले असल्याचे पोलीस ठाण्यात जाऊन सांगायचे, असा बनाव करण्यात आला होता. मात्र जयसिंगपूर पोलिसांच्या प्रसंगावधानाने हे बिंग फुटले.
मृतदेहाचे कोल्हापूर सीपीआरमध्ये शवविच्छेदन
मारहाणीमध्ये मृत पावलेल्या अर्जुन याच्या देहावर मारहाणीचे विविध प्रकारचे व्रण, चटके दिलेल्या खुना आढळून आल्याने त्याचा मृतदेह कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. या घटनेच्या तपासकामी कोल्हापूर इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथक व जयसिंगपूर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी पथक तपास करीत आहेत. संशयाच्या आरोपावरून मारहाण झालेल्या दोघांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार येत आहेत.