गोवा-बेळगाव वाहतूक चार तास ठप्प
वाळपई / प्रतिनिधी
पावसाळा सुरू होऊन अवघेच दिवस झाले असतानाच गोवा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर चोर्ला घाट परिसरामध्ये दरडी कोसळण्यास सुरुवात झालेली आहे. काल मंगळवारी दुपारी दोन वाजता गोवा हद्दीमध्ये दोन ठिकाणी दरड कोसळल्यामुळे जवळपास चार तास वाहतूक ठप्प झाली होती. संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान रस्ता मोकळा केल्याने वाहतूक सुरू झाली आहे.
दरडीच्या ठिकाणी असलेले एक झाड अचानकपणे रस्त्यावर आल्यामुळे आणि दरड कोसळल्यामुळे गोवा-बेळगाव दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
वाळपई अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष गांवस यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्ता मोकळा करण्यास प्रारंभ केला. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागातर्फे रस्त्यावर कोसळलेल्या दरडीची माती काढण्यास प्रारंभ करण्यात आला. संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रस्ता एका बाजूने मोकळा केल्यामुळे मोठय़ा प्रमाणात अडकून पडलेली वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली. महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठय़ा प्रमाणात रांगा लागल्या होत्या. त्यातच धो-धो कोसळणारा पाऊस होता, यामुळे प्रवाशांना बऱयाच प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागले.
सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंता श्री. वेलिंगकर यांनी सांगितले की, चोर्ला घाटात कोसळलेली दरड हटविण्याचे काम संपुष्टात आले असून सध्यातरी वाहतूक सोडण्यात आलेली आहे. राहिलेले काम उशिरापर्यंत सुरु राहणार आहे. मोठय़ा प्रमाणात पडणाऱया पावसामुळे या भागांमध्ये काही प्रमाणात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे या महामार्गावरून वाहतूक करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
गतवषी 80 तास वाहतूक झाली होती ठप्प
गेल्यावषी जुलै महिन्यामध्ये मोठय़ा प्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. यामुळे जवळपास 80 तास बेळगाव-गोवा दरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती. तरीही सार्वजनिक बांधकाम खाते या महामार्गासंदर्भात निष्काळजीपणा करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अत्यंत कमी अंतराचा व सर्वचदृष्टीने सुरक्षित असा हा महामार्ग आहे. यामुळे गोवा-बेळगाव दरम्यान मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत असते. अशा रस्त्याची काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.