आयओसी चेअरमन सिंग यांची माहिती : बीएस-4 मधून बीएस-6 मध्ये पदार्पण
नवी दिल्ली
देशात एक मोठा बदल होणार असून, 1 एप्रिल 2020 पासून भारतात जगातील सर्वात स्वच्छ पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे. भारत सर्वात स्वच्छ पेट्रोल आणि डिझेल वापरण्यासाठी तयार आहे. दरम्यान, 1 एप्रिलपासून यूरो-4 श्रेणीचे इंधन (भारत फेज 4) वरून यूरो-6 श्रेणीच्या (भारत फेज 6) इंधनाचा पुरवठा सुरू होणार आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे चेअरमन संजीव सिंग यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली. भारतात वाहनांचे उत्सर्जन कमी करण्यासाठी भारत श्रेणी 4 वरून भारत श्रेणी 6 मध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. याला तीन वर्षात यशस्वीतेच्या अंमलबजावणीसाठी तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जवळपास सर्व कंपन्यांनी 2019 पासून बीएस-6 च्या अनुकूल पेट्रोल आणि डिझेलचे उत्पादन सुरू केले आहे. यात भारत जगातील निवड देशांपैकी एक आहे, जो सर्वात स्वच्छ पेट्रोल आणि डिझेलचा वापर करत आहे. आता पेट्रोलियम कंपन्यांनी देशात पेट्रोल-डिझेलच्या शेवटच्या थेंबाला बीएस-6 मानक असलेल्या इंधनात स्थलांतरित करण्याचे पाऊल उचलले आहे, असे सिंग यांनी सांगितले. सरकारने 2015 मध्ये 1 एप्रिल 2020 पासून युरो-6 उत्सर्जन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर बीएस-6 पेट्रोल आणि डिझेलची विक्री होईल. सध्या युरो-4 श्रेणीची विक्री होत आहे.
बदल करण्यासाठी लागली तीन वर्षे
पुढील काही आठवडय़ात बीएस-6 श्रेणीचे पेट्रोल आणि डिझेल डिपोमधून पेट्रोल पंपावर पोहोचेल. आम्हाला 100 टक्के खात्री आहे की, 1 एप्रिलला देशात सर्व पेट्रोल पंपावर बीएस-6 कार्यक्षम पेट्रोल आणि डिझेल मिळेल. भारताने युरो-3 समतुल्य इंधन वापरले आहे. 2010 मध्ये 350 पीपीएसची सल्फर सामग्री आणि बीएस-4 ला बदलण्यासाठी सात वर्ष लागली. तर बीएस-4 ला बीएस-6 करण्यासाठी फक्त तीन वर्षे लागली, असेही सिंग यांनी स्पष्ट केले.