प्रतिनिधी/ सातारा, खंडाळा
जालना जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणारे कराड तालुक्यातील तारूखचे रहिवाशी पोलीस निरीक्षक संग्राम शिवाजीराव ताटे (वय 37) हे गेल्या 13 दिवसापासून बेपत्ता होते. ते खंडाळा येथील जुना टोलनाका जवळ एका हॉटेलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांच्या हातावर फोन नंबर लिहल्याने यावर संपर्क साधून यांची माहिती नातेवाईक व पोलिसांना देण्यात आली. खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी त्यांना ताब्यात घेतले. हॉटेलच्या एका खोलीत त्यांनी लिंबू पाणी, नाष्टा देऊन बसविले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना तत्काळ खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर संग्राम ताटे यांना त्यांच्या भावाच्या ताब्यात दिले असून त्यांना तारुख या त्यांच्या गावी नेहण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे दि. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता दोन्ही मोबाईल घरात ठेऊन मित्राकडे जातो असे सांगून बेपत्ता झाले होते. दोन दिवस झाले तरी पोनि ताटे हे परत न आल्याने त्याच्या पत्नीने बेपत्ता झाल्याची तक्रार जालना पोलीस ठाण्यात दिली होती. जालनासह सातारा जिल्हा पोलीसही त्याचा शोध घेत होते. दहा-बारा दिवस झाले तरी त्यांचा काहीच शोध लागत नसल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतिमान केली. तोच दि. 13 रोजी रात्री उशिरा खंडाळा येथील जुना टोलनाका जवळ एका हॉटेलमध्ये पोनि ताटे हे बसले होते. यावेळी त्यांनी पुसट अक्षरात हातावर पत्नीचा मोबाईल नंबर लिहला होता. हा नंबर हॉटेलमध्ये येणाऱया ग्राहकांना दाखवत असताना ते बेशुद्ध झाले. ही बाब ग्राहक व मालकांच्या लक्षात आल्याने त्यांनी या नंबरवर फोन केला. त्यांच्या पत्नीला यांची माहिती देण्यात आली. त्यांनी तत्काळ नातेवाईक व तपास अधिकाऱयांना पोनि ताटे हे खंडाळा येथे असल्याचे सांगितले. पोलिसांनी हॉटेलमध्ये पोहचून पुढील उपचारासाठी त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल केले आहे.
बेपत्ता होण्याचे कारण अद्याप अस्पष्टच…
पदोन्नती मिळून बदली होताच पोनि ताटे हे बेपत्ता झाल्याने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली. त्यांचा शोध लागत नसल्याने पोलीसही चक्रावून गेले होते. जालना येथे कार्यरत असलेले पोनि ताटे हे नक्की गेले कुठे असा एकाच प्रश्न समोर उभा होताच तोच दोन दिवसापासून ते खंडाळा येथे फिरत होते. काही दिवसपासून त्यांना नीट जेवण न मिळाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना स्वतःची माहितीही नीट सांगता येत नव्हती. वरिष्ठ अधिकाऱयांचा दबाब की आणखी काय? यांचे कारण ते सापडले असले तरी अस्पष्टच आहे.
सलग 13 दिवस पायी चालण्याने पायाला जखमा
संग्राम ताटे हे सलग 13 दिवस चालत राहिले.. कोणता तरी मानसिक दबाव असल्याचे समजते. सततच्या चालण्याने त्यांच्या पायाला जखमा सुध्दा झाल्या होत्या. शरीरात अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना चक्कर आली. शिरवळच्या कंपनीत कामाला असणाऱया कामगारांनी त्यांना मदत करत खाऊ घातले.