प्रतिनिधी / कोल्हापूर
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर पनवेल नजिक मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक आणि प्रॅक्टीस फुटबॉल क्लबचे माजी फुटबॉलपटू रणवीर उदाजीराव चव्हाण (वय 55, रा. आर. के. नगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे अधिकारी दीपक चव्हाण व चालक गंभीर जखमी झाले. अपघाताचे वृत्त समजताच जिल्हा बँकेसह क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली.
दरम्यान, रणवीर चव्हाण यांच्या पार्थिवावर रात्री पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी चव्हाण यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी प्रॅक्टीस फुटबॉल क्लबच्या जागेत ठेवण्यात आले होते. शहरातील फुटबॉल खेळाडुंनी पुष्पहार अर्पण करुन श्रद्धाजली वाहिली. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन भाऊ, दोन मुली, नातू असा परिवार आहे. चव्हाण यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले.
रणवीर चव्हाण प्रॅक्टीस फुटबॉल क्लबच्या वरिष्ठ संघातील उत्कृष्ठ फुटबॉलपटू होते. 1984 ते 1996 पर्यंत त्यांनी फुटबॉलचे मैदान गाजवले होते. मैदानात हाफ ला खेळणारे रणवीर यांचे पासिंगमध्ये मोठी खासियत होती. निर्णायक पेनंटी मारुन त्यांनी प्रॅक्टीस संघाला अनेक सामाने जिंकुन दिले होते. सडनडेथवर गोल करण्यातही ते माहीर होते. त्यांच्या अपघाती निधनाने एक अव्वल खेळाडू गमावला, अशा शब्दात फुटबॉल खेळाडुंनी श्रद्धांजली वाहिली.
मुंबईत मंत्रालयात जात असताना काळाचा घाला
रणवीर चव्हाण व घोरपडे कारखान्याचे अधिकारी सोमवारी रात्री खासगी गाडीने मुंबईला निघाले होते. साखर कारखान्याच्या कर्जाबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी मंगळवारी त्यांची मंत्रालयात बैठक होती. कर्ज प्रकरणाचे प्रस्ताव घेऊन ते रात्री मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. पनवेल नजीक त्यांच्या कारने समोरच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. या भीषण धडकीत रणवीर यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताचे वृत्त समजताच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घटनास्थळासह खालापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन रणवीर चव्हाण यांच्या पार्थिवास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच वाशी येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये जाऊन मॅनेजर जखमी दीपक चव्हाण व कारचालक यांचीही ही विचारपूस केली.
केडीसीसी बँकेने प्रामाणिक मोहरा गमावला-मंत्री हसन मुश्रीफ
रणवीर चव्हाण हे एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि सच्चे अधिकारी होते. सदैव सकारात्मक वृत्तीने काम करणारे ते एक धडाडीचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे बँकेने एक प्रामाणिक मोहरा गमावला आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाचा आधारवड तर कोसळलाच आहे, तसेच बँकेचेही अपरिमित नुकसान झाले आहे. मी व्यक्तीशः आणि बँक सदैव चव्हाण कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे राहू. असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.