प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात डेल्टा व्हेरीयंट ऑफ कन्सर्नचे 9 रूग्ण संगमेश्वर तालुक्यात आढळल्यानंतर पुढच्या टप्यात आणखी काही नमुने जनुकीय चाचणीसाठी काढण्यात आले आहेत. दुसऱया टप्प्यात जिल्हय़ातून 117 लोकांचे स्वॅब दिल्लीतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल लवकरच येतील. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.
जिल्हय़ात 2 आठवडय़ांपूर्वी डेल्टा व्हेरीयंटचे एकाच तालुक्यात 9 रूग्ण आढळले होते. यामध्ये एक 80 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र उर्वरित 8 रूग्णांमध्ये 3 लहान मुलेही होती. हे सर्वजण डेल्टावर मात करून घरी परतले आहेत. मात्र डेल्टाचा फैलाव जिल्हय़ात इतरत्र होवू नये, यासाठी संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचेही स्वॅब घेण्यात आले, याशिवाय जिल्हय़ातील इतर संशयास्पद रूग्णांचे स्वॅबही घेण्यात आले. अशा 117 रूग्णांचे स्वॅब दिल्ली येथे पाठवण्यात आले आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील 8 रूग्णांचे स्वॅब असल्याचे डॉ.फुले यांनी सांगितले. या तपासणीमध्ये रूग्णांमध्ये डेल्टा व्हेरीहंट आहे का याची पडताळणी होईल. लवकरच याचे अहवाल प्राप्त हेतील. सध्या या व्हेरीयंटविषयी घाबरण्याची गरज नाही. कोरोना रूग्णसंख्या वाढीत रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्याचा समावेश आहे. नागरिकांनी मास्कचा वापर व इतर नियमावलींची अंमलबजावणी केल्यास कोरोना संख्या आटोक्यात येवू शकते. डेल्टावरही रूग्णांनी मात केली आहे. घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. संघमित्रा फुले यांनी केले आहे.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्याच्या पायाभूत सुविधा वाढवताना लसीकरणावर भर द्यावा, ऑक्सिजन निर्मिती व साठवणुकीसाठी जिल्हा ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडा करून आवश्यक कामे जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार जिल्हा रूग्णालयाने ऑक्सिजन आराखडा तयार केला आहे. मे 2021 मध्ये असणारी 27 मेट्रीक टन क्षमता आता तिप्पट म्हणजे 81 मेट्रीक टन हेणार आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयात 44 जम्बो सिलिंडर असून चिपळूण येथील सिध्दीविनायक हॉस्पीटलमध्ये 10 ते 12 जम्बो सिलिंडर आहेत. काही दिवसात महिला रूग्णालयातील जम्बो ऑक्सिजन प्लॅन्टही सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडा तयार
तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात तिप्पट क्षमतेने ऑक्सिजन निर्मिती करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार 81 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठीचे 60 टक्के काम पूर्णत्वाला गेले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल. यासाठी ऑक्सिजन आराखडाही तयार केल्याची माहिती डॉ. फुले यांनी दिली.