ऍशेस मालिकेतील दुसरी कसोटी गुरुवारपासून, इंग्लंडचे अँडरसन-ब्रॉड उपलब्ध
मेलबर्न / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज जोश हॅझलवूड प्रतिष्ठेच्या ऍशेस मालिकेतील दुसऱया कसोटी सामन्यात खेळू शकणार नसल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी ऍडलेडमध्ये गुरुवारपासून दिवस-रात्र खेळवली जाईल. यापूर्वी ब्रिस्बेनमधील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून एकतर्फी विजय संपादन केला, त्यावेळी हॅझलवूडला दुखापत झाली होती.
ऍडलेड कसोटीसाठी 14 सदस्यीय ऑस्ट्रेलियन संघात जलद गोलंदाज मायकल नेसर, झाय रिचर्डसन व लेगस्पिनर मिशेल स्वेप्सन यांचा समावेश आहे. मेलबर्न व सिडनी कसोटीसाठी ऍडलेडच्या सामन्यानंतर संघनिवड केली जाईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने येथे स्पष्ट केले.
अँडरसन, ब्रॉड ‘तंदुरुस्त’
दरम्यान, इंग्लिश प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड हे जलद गोलंदाज दुसऱया कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असतील, असे येथे जाहीर केले. अँडरसन व ब्रॉड यापूर्वी पहिल्या कसोटीत खेळू शकले नव्हते. आता मात्र हे दोन्ही अनुभवी गोलंदाज सुसज्ज असून त्यांनी गुलाबी चेंडूवर सरावासही प्रारंभ केला असल्याचे सिल्वरवूड यांनी नमूद केले.
‘पहिली कसोटी खेळता येणार नाही, हे स्पष्ट होताच स्टुअर्ट ब्रॉड अतिशय निराश झाला होता. पण, ही मालिका मोठी असल्याचे आम्ही त्याच्या निदर्शनास आणून दिले. येथे खेळण्यासाठी तो अतिशय महत्त्वाकांक्षी होता’, असे ते शेवटी म्हणाले.