एमआयएम शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांचा नगरसेवक तोफिक शेख यांना टोला
एमआयएमच्या शाब्दी आणि शेख मध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
एक दिवस काम आणि महिनाभर गायब असा अध्यक्ष मी कधीच नव्हतो अशी टीका एमआयएमचे नगरसेवक तोफिक शेख यांनी शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांच्यावर काही दिवसापूर्वी केली होती. दरम्यान याविषयी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांनी शनिवारी पलटवार केला असून ज्यांना आमचे काम दिसत नाही त्यांनी आपल्या डोळ्यांची मोफत तपासणी करून घ्यावी असा टोला शाब्दी यांनी नगरसेवक तोफिक शेख यांना लगावला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत एमआयएम मधील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रवेशावर एमआयएमचे शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी आमचे प्रमुख कार्यकर्ते कुणीही पक्ष सोडून गेले नाहीत असे सांगत आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कोविडमध्ये काम केल्याचा लेखाजोखा मांडला. कोरोना काळात कोण किती काम केले, हे जनता जाणते आणि मी एक दिवस काम आणि एक महिनाभर गायब असा अध्यक्ष कधीच नव्हतो अशी टीका शेख यांनी शाब्दी यांच्यावर केली होती. याला प्रत्युत्तर शहराध्यक्ष फारूक शाब्दि यांनी एका खासगी कार्यक्रमात पैलवान शेख यांना लगावला आहे. शाब्दी म्हणाले काही लोकांना मी आणि एमआयएम दिसत नाही. आपण नेत्र शिबीर घेतलं हे चांगले काम केले आहे. ज्यांना आमचे काम दिसत नाही, त्यांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घ्यावी, तर व्यवस्थित दिसेल असा टोला लगावला आहे.
एकंदरीत मागील आठवडाभरापासून चुप्पी साधलेल्या शाब्दी यांनी अखेर पैलवान शेख यांना चांगलाच टोला लगावला आहे. याचे प्रत्युत्तर शेख कसे देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच एमआयएम मध्ये गटबाजी असल्याचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे.