वृत्तसंस्था / ओटावा
कॅनडातील खलिस्तानवादी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येसंबंधी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी आरोप केले असले तरी त्यांचा विपरीत परिणाम भारत आणि कॅनडा यांच्या सेनांच्या परस्पर संबंधांवर होणार नाही, अशी स्पष्टोक्ती त्या देशाचे सेना उपप्रमुख मेजर जनरल पीटर स्कॉट यांनी दिली आहे.
ट्रूडो यांनी काय आरोप केले आहेत, याची मला पूर्ण माहिती आहे. या प्रश्नी कॅनडाच्या सरकारची एक विशिष्ट भूमिका आहे. तसेच आमच्या सरकारने भारताला या हत्या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, हे देखील आम्हाला माहीत आहे. तथापि, सध्या सुरु असलेल्या प्रशांत-भारतीय परिषदेच्या कार्यक्रमावर या घटनांचा कोणताही परिणाम होणार नाही. भारताची सेना आणि कॅनडाची सेना यांच्यामध्ये विशिष्ट मुद्द्यांवर सहकार्य असून ते अबाधित राहील. हे सेना सहकार्य आणि ती हत्या घटना यांचा काहीही संबंध नाही. प्रत्येक देशाची सरकारे त्यांच्या धोरणाप्रमाणे काम करीत राहतील. तथापि, सेना सहकार्य हे महत्त्वाचे असल्याने तेही सुरुच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतात आयोजन
प्रशांत-भारतीय सेना परिषदेचे आयोजन भारतात करण्यात आले असून परिषदेला प्रारंभही झाला आहे. या परिषदेत भाग घेण्यासाठी कॅनडाचे सेना उपप्रमुख आलेले आहेत. त्यांच्यासह सर्व प्रशांत-भारतीय परिषदेच्या सदस्य देशांचे सेनाप्रमुख आणि काही अधिकारी उपस्थित आहेत. भारत-प्रशांतीय क्षेत्र कोणाच्याही दबावापासून मुक्त कसे ठेवता येईल, यावर या परिषदेत विचार होईल.
सहकार्यावर भर देणार
या परिषदेचे आमंत्रण आम्हाला देण्यात आले याचा आनंद आहे. आम्ही या परिषदेच्या सदस्य देशांशी सर्व प्रकारचे सहकार्य करू इच्छितो. प्रशांत सागरीय क्षेत्रात शांतता असावी आणि तो प्रदेश दबावमुक्त असावा हे आमचेही धोरण आहे. यासाठी या परिषदेच्या विविध देशांशी आम्ही संपर्कात असून सैनिकांना प्रशिक्षण, युद्ध सराव आदी कार्यांमध्ये आम्ही सहकार्य करत आहोत. या परिषदेचे आयोजन भारतात केल्यामुळे आम्ही भारताचे आभारी आहोत. भविष्यकाळातही असे सहकार्य वृद्धिंगत होईल, असे प्रतिपादन स्कॉट यांनी केले.