प्रतिनिधी/ बेळगाव
ठग्गर व नविलतीर्थ गोदामातील साहित्य चोरल्याच्या आरोपावरून सौंदत्ती पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून चोरलेला ठग्गर व स्टील जप्त करण्यात आले आहे.
प्रकाश रुद्राप्पा कडदळ्ळी, मंजुनाथ कल्लाप्पा जालीहाळ, शिवराज यल्लाप्पा कडदळ्ळी, तिघेही रा. तडहाळ, ता. नवलगुंद, जि. धारवाड यांना ठग्गर चोरी प्रकरणात तर खलीलअहमद कमरुद्दीन तालीकोटी, सय्यद आप्पासाब मुल्ला दोघेही रा. मुनवळ्ळी, शिवप्पा फकिराप्पा तग्गीनमनी, रा. तग्गीहाळ, ता. सौंदत्ती यांना स्टील चोरी प्रकरणात अटक झाली आहे.
रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सौंदत्तीचे पोलीस निरीक्षक करुणेशगौडा जे., पोलीस उपनिरीक्षक आनंद क्यारकट्टी, के. एम. तल्लूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. 8 नोव्हेंबर रोजी बेटसूर येथील मंजुनाथ कल्लाप्पा देसार यांच्या शेडमधून सुमारे 20 हजार रुपये किमतीचा जातीवंत ठग्गर चोरण्यात आला होता. तर 11 जुलैच्या रात्री, 10 ते 12 जुलै रोजी सकाळी 10.45 यावेळेत नविलतीर्थ डॅमच्या गोदामातून पाटबंधारे विभागाने ठेवलेले स्टीलचे साहित्य पळविले होते. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून चोरीसाठी वापरण्यात आलेल्या दोन दुचाकी, एक ठग्गर व 24 किलो स्टील असा एकूण सव्वालाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.