वार्ताहर / डिगस:
शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये समन्वय असल्यास शाळा ही विद्येचे घर बनते व यातूनच भावी पिढी घडते. मुलांच्या अंगीभूत गुणांना वाव दिल्यास प्रत्येक विद्यार्थी हा यशाचे शिखर गाठतो. असाच आदर्श ठेवत डिगस गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा डिगस पूर्व येथे मंगळवारी प्रशाळेच्यावतीने ‘भाजी बाजार’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना शिकवत असताना जीवनोपयोगी शिक्षण देण्याच्या उद्देशाने दैनंदिन व्यवहार कसा करावा, याचा थोडाफार सराव होण्याच्या उद्देशाने डिगस पूर्व शाळेच्या व्यवस्थापन समितीने राबविलेला हा उपक्रम उपस्थिताना भावला. या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतूक केले.
प्रशालेच्या आवारात भरविण्यात आलेल्या ‘भाजी बाजार’ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर पंचायत समितीचे उपसभापती जयभारत पालव, जि. प. सदस्य अमरसेन सावंत, डिगस सरपंच सतीश सुर्वे, माजी उपसभापती शिवाजी घोगळे, माजी सरपंच नित्यानंद कांदळगावकर, बाळा पवार, ग्रामपंचायत सदस्य उदय घोगळे, मयुरी सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनंत तावडे, आवळेगाव केंद्रप्रमुख भिकाजी तळेकर, भाजी बाजार समिती अध्यक्ष प्रभाकर तावडे, मुख्याध्यापक लवू चव्हाण, तातोजी तावडे, भास्कर पवार, अनिल गोसावी, संजय तावडे, चेऊलकर, भाग्यश्री पवार, सुवर्णा तावडे तसेच सर्व समिती सदस्य, ग्रामस्थ, केंद्रातील शिक्षक वर्ग व शिक्षणपेमी मोठय़ा संखेने उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढून मुलांना बक्षिसेही दिली. तसेच विविध प्रकारच्या भाज्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्या ग्रामस्थांनी विकत घेत मुलांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमादरम्यान या वर्षी जिल्हास्तरावर समूहगीत स्पर्धेत विजेत्या मुलांचा तसेच तालुकास्तरावर उपविजेत्या मोठय़ा गटातील मुलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. शाळेने प्राप्त केलेले यश गावासाठी भूषणावह असल्याचे गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी काढत मुलांचे व सर्व शिक्षकांचे कौतूक केले. तसेच शाळेत सुरू असलेल्या सर्व उपक्रमांचे उपसभापती जयभारत पालव, जि. प. सदस्य अमरसेन सावंत, सरपंच सतीश सुर्वे, माजी उपसभापती शिवाजी घोगळे व केंद्रप्रमुख तळेकर यांनी कौतूक केले. मुख्याध्यापक लवू चव्हाण हे शाळेच्या विकासासाठी गेली दहा वर्षे विविध उपक्रम राबवत असून त्यांचे कार्य आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार जि. प. सदस्य अमरसेन सावंत यांनी काढले. सूत्रसंचालन शाळेतील ज्येष्ठ शिक्षक दशरथ पवार यांनी केले. आभार पदवीधर शिक्षक संजय सावंत यांनी मानले.