चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या 59 ऍपवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता समयोचितच म्हणायला हवा. पूर्व लडाखमधील गलवान खोऱयात मागच्या 15 दिवसांपूर्वी चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांना वीरगती प्राप्त झाल्यानंतर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. परंतु, चीनच्या ताबारेषेवरील कारवाया अद्यापही सुरूच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सीमेवरील संघर्षाबरोबरच अन्य माध्यमातूनही लढण्याच्या दृष्टीने उचललेले हे डिजिटल पाऊल आवश्यकच म्हणावे लागेल. भारत आणि चीन या दोन राष्ट्रांमधील संबंध हे बव्हंशी तणावाचे व परस्परांविषयी संशयाचेच राहिलेले आहेत. एकीकडे दोस्तीचे नाटक करायचे आणि दुसरीकडे कुरापती काढायच्या, हा चीनचा पूर्वापार विशेष. त्यातूनच ‘हिंदी-चिनी भाई भाई’ची साखरपेरणी करीत 1962 मध्ये चीनकडून भारतावर युद्ध लादण्यात आले. त्यानंतरही या ना त्या माध्यमातून डॅगन खोडय़ाच करीत राहिला. या दरम्यान ब्रह्मपुत्रेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असले, तरी दोन्ही देशांमध्ये कधीही विश्वासाचे संबंध प्रस्थापित झाल्याचे दिसले नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा भारत दौरा, गुजरात भेट व पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची झोपाळय़ावरील सुहास्यवदनी छायाचित्रे तेव्हा कितीही आश्वासक वाटली, तरी त्याने केवळ झुलवण्याचेच काम केले, असेच आता म्हणावे लागेल. सरतेशेवटी पुन्हा एकदा डॅगनने आपले विषारी दात दाखवून दिले आहेत. माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी चीन हाच भारताचा शत्रू क्रमांक एक असल्याचे विधान केले होते. त्यातील समर्पकता आता ध्यानात यावी. मुळात चीन हे अत्यंत महत्त्वाकांक्षी राष्ट्र असून, सहा देशांची जमीन आत्तापर्यंत ड्रगनने गिळंकृत केली आहे. अमेरिकेशी स्पर्धा करणाऱया या राष्ट्राला आशिया वा हिंदी महासागरावर वर्चस्व हवे आहेच. शिवाय जगभर आपला प्रभाव निर्माण करण्याचा ड्रगनचा मनुसबा आहे. तथापि, कोरोनाचा जन्मदाता देश व या विषाणू व तत्सम बाबींसंदर्भातील संदेहामुळे जगातील बहुतेक राष्ट्रे आज चीनसंदर्भात काहीसा सावध पवित्रा बाळगून आहेत. स्वाभाविकच गुंतवणुकीसह चीनच्या अर्थकारणाला मोठा तडा गेल्याचे दिसून येते. हा तडाखा चीनच्या व्यापारी प्रभावाला छेद देऊ शकेल. चीनला धक्का देण्याच्या दृष्टीने भारताने घेतलेली भूमिकाही महत्त्वपूर्ण होय. भारतात 40 कोटीपेक्षा जास्त स्मार्ट फोन यूसर्ज आहेत. यातील जवळपास 30 कोटी यूजर्सच्या मोबाईलमध्ये चीयनीज ऍप्लिकेशन्स आहेत. मात्र, हे ऍप देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून धोकादायक ठरत असतील, तर त्यांच्यावर फुली मारून सरकारने संबंधितांना योग्य तो संदेश दिला आहे, असे म्हणता येईल. याने मोठे आर्थिक नुकसान होणार नसले, तरी काही प्रमाणात का होईना त्यांना फटका बसणार, हे निश्चित. चीनविषयी भारतीयांच्या मनात नकारात्मक मानसिकता निर्माण झाली, तर त्याचे गंभीर परिणाम भविष्यात या देशाला भोगावे लागू शकतात. बंदी घालण्यात आलेल्या ऍपमध्ये टिकटॉकसह शेअर इट, यूसी ब्राउजर, वंडर कॅमेरा अशा ऍपचा समावेश आहे. यातील सर्वच ऍप सगळे वापरत असतील, अशातला भाग नाही. तरीदेखील टिकटॉकसारख्या काही ऍपने निश्चितपणे भारतीयांच्या मनावर गारूड घातल्याचे दिसून येते. परंतु, कोणत्याही माध्यमाचा गैरवापर होत असेल, तर त्यातून खासगी माहिती चोरली जात असेल, तर त्यातील वरपांगी ग्लॅमरवर भाळून चालणार नाही. मागच्या काही दिवसात चिनी हॅकर्सकडून मोठय़ा प्रमाणात भारतात सायबर हल्ले घडविल्याचेही निदर्शनास आले आहे. म्हणूनच चीनपासून डिजिटलदृष्टय़ाही सावधानता बाळगावी लागेल. वेगवेगळय़ा ऍपला पर्यायही निर्माण केले पाहिजेत. भारतीय तंत्रज्ञांमध्ये प्रयोगशीलता, कल्पकतेची कमी नाही. म्हणूनच भविष्यात या आघाडीवरही काम व्हावे. आज कोरोनामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था संकटात आहे. अमेरिकेकडून आर्थिक महासत्तापद खेचू पाहणाऱया चीनचे अर्थकारणही ढासळले असून, सगळीच राष्ट्रे आपापले आर्थिक संतुलन साधण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा काळात चीनसारखा देश मात्र आगळीकी, कुरापती वा विस्तारवादी धोरणे राबविण्यातच धन्यता मानतो, यातून त्यांच्या अजेंडय़ावर प्रकाश पडतो. अर्थात चीनची विविध आघाडय़ांवर कोंडी केल्याशिवाय त्यांचे डोळे उघडणार नाहीत. भविष्यात यापेक्षाही कडक पावले उचलण्याकरिता आपण तयार रहायला हवे. पुढच्या काही दिवसात कदाचित अमेरिकेकडून चीनवर डिजिटल निर्बंध घातले जाण्याची चिन्हे आहेत. चीनसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार 95 अब्ज अमेरिकन डॉलरच्या आसपास असून, त्यात चीनचा वाटा मोठा आहे. चीनचे नस्ते उद्योग कायम राहिल्यास नक्कीच त्याचा परिणाम व्यापार उदिमावर संभवतो. तसे झाल्यास भारतापेक्षा चीनला त्याची सर्वाधिक झळ बसेल, हे निश्चित. आज भारतीय बाजारपेठा चीन वस्तूंनी व्यापल्या आहेत. मात्र, चीनविरोधात भारतीयांमध्ये असंतोष वाढतो आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालावा, चायना मेड वस्तू वापरू नका, अशी आवाहने होत आहेत. अर्थात त्याकरिता सर्वात आधी पर्याय निर्माण करावे लागतील. मार्केट खेळण्यांचे असो वा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे, आत्मनिर्भरतेचा वसा घ्यावा लागेल. यूज अँड थ्रो हे चिनी वस्तूंचे वैशिष्टय़ मानले जाते. स्वस्तात मस्त असलेल्या या वस्तू दर्जात मात्र मार खातात. म्हणून वाजवी व दर्जेदार असा सुवर्णमध्य साधत अवती भवती घातलेले हे चिनी पाश सर्वप्रथम हळूहळू सुटे करावे लागतील. चीनसोबत युद्ध अटळच असून, ते डिजिटलीय, बाजारस्तरीय, आर्थिक अशा कोणत्याही पद्धतीचे असू शकते. आपला डिजिटल ‘वार’ डॅगनच्या वर्मी बसणारा असला, तरी तेवढय़ाने हुरळून चालणार नाही. पुढे अनेक पातळय़ांवर संघर्षात्मक परिस्थिती उद्भवू शकते. त्यादृष्टीने परराष्ट्रीय, राजनीतीक, रणनीतीक अशा सगळय़ाच माध्यमातून चीनला एकटे पाडून त्यांचा ‘गेम’ कसा करता येईल, यावर लक्ष ठेवायला हवे.
Previous Articleइये मास्कोचिये नगरी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment