सरकारला सुदिन ढवळीकरांचे आव्हान
वार्ताहर /मडकई
गेल्या वीस वर्षात सार्वजनिक बांधकाम खात्यात बढतीच झाली नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हल्लीच केलेल्या विधानाची मगो ज्य्sाष्ठ नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी खिल्ली उडवत आपण निर्माण केलेली पद व बढतीची माहिती दिली. मुख्यमंत्र्याना बांधकाम खात्याविषयी कसलेच ज्ञान नसल्याचा आरोप केला तर बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी 30 डिसेंबर पर्यंत सर्व महामार्ग व अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्सीकरण पूर्ण केल्यास आपण त्यांच्या सोबत बिनशर्त राहू असे ही जाहीर आव्हान मगो नेते आमदार ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
वास्तूविशारद बांधकाम इमारतीच्या उद्घाटन सोहळय़ावेळी मुख्यमंत्री म्हणाले, वीस वर्षात बढतीच दिलेली नाही हे त्यांचे विधान ऐकून हसावे की, रडावे हेच कळेनासे झाले. समोर बसलेले अभियंते हसत हसत त्यांना दाद देत असलेले पाहून प्रश्न पडला. बांधकाम खात्यात मुख्य अभियंते हे एकच पद होते. 2002 साली माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची परवानगी घेऊन आपण तीन मुख्य अभियंत्यांची पदे निर्माण करून अभियंत्यांना बढती दिली. एकूण 14 अभियंते मुख्य अभियंते या पदावरून निवृत्त झाले. मुख्यप्रधान अभियंते हे पदही तयार केले. या स्थानावर अभियंत्यांना बढती दिली आणि प्रधान अभियंते या पदावरून आठ अभियंते निवृत्त झाले. या खात्यात एकूण अंदाजे 350 बढती आपल्या कार्यकाळात आमदार सुदिन ढवळीकर यांनी केल्याची माहिती यावेळी दिली.
15 नोव्हेंबरपर्यंत हॉटमिक्स प्लांट सुरू होत नसतो. हॉटमिक्सकरणासाठी चाळीस डीग्री सेंटीग्रेट खडी तयार करावी लागते. ही सत्यता लक्षात घेऊनच सार्वजनिक बांधकाम मंत्री व मुख्यमंत्र्यांनी जनतेला आश्वासन द्यावे. गोव्यातील महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, अंतर्गत रस्ते या सर्वांचे हॉटमिक्सीकरण 30 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन सरकार जनतेची थट्टा करीत आहे, असे ते म्हणाले.
तीन महिन्यात खाण व्यवसाय सुरू करणार अशा खोटय़ा आश्वासनासारखी आश्वासन सरकारने देऊ नये. सरकारने सर्व रस्त्याचे हॉटमिक्सीकरण 30 डिसेंबर सोडाच फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केल्यास आपला स्वतःचा त्यांना बिनशर्त पाठिंबा असेल असे पत्रकारांशी बोलताना मगो नेते श्री ढवळीकर यांनी सांगितले.