तत्कालिन नायब तहसीलदार गौतम काकडेंचा आरोप
प्रतिनिधी/ सातारा
पुरवठा विभागात अधिकारीच घोटाळे करतात. केंद्र शासन धान्य पाठवते. ते गोरगरिबांपर्यंत पोहचते की नाही हे तपासणे त्यांचे काम आहे. परंतु हप्तेगिरी करणाऱया अधिकाऱयांच्यामुळेच धान्य घोटाळा जिह्यात झाला होता. तत्कालिन जिल्हाधिकारी ओमप्रकाश गुप्ता, तत्कालिन कोरेगावचे तहसिलदार सुप्रिया बागवडे, तत्कालिन दहिवडीचे तहसीलदार संजय तेली आणि कोरेगावचे तत्कालिन उपलेखापाल प्रकाश कांबळे यांना मी हप्ता देत नसल्याने माझ्याविरोधात खोटी कागदपत्रे रंगवली गेली. मुंबई उच्च न्यायालयाने त्या चौघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय दिला आहे. त्यानुसार मी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे, असे पत्रकार परिषदेत तत्कालिन नायब तहसीलदार गौतम काकडे यांनी जाहीर केले.
काकडे हे पत्रकार परिषदेत माहिती देताना पुढे म्हणाले, मी नायब तहसीलदार पदाच्या परीक्षेत जिह्यात त्यावेळी पहिला आलो होतो. मी माझ्या हुशारीवर पोस्ट मिळवली होती. परंतु अधिकाऱयांच्या भ्रष्टाचारामुळे माझ्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱयाला रस्त्यावर आणण्याचे काम केले आहे. मी वाठारस्टेशनचा गोदामपाल असताना तत्कालिन तहसीलदार सुप्रिया बागवडे, तत्कालिन दहिवडी तहसीलदार संजय तेली, तत्कालिन उपलेखापाल प्रकाश कांबळे यांनी खोटी कागदपत्रे तयार करणे, चुकीचे अहवाल तयार करुन तत्कालिन जिल्हाधिकारी ओमप्रकाश गुप्ता यांना सादर केला. तत्कालिन जिल्हाधिकाऱयांनी खोटय़ा अहवालाची शहानिशा केली नाही. त्याची पडताळणी न करताच तत्कालिन जिल्हाधिकाऱयांनी मी अनुसूचित जातीचा असल्याने बेफिकीरीने माझ्यावर कारवाई केली. त्यांनी पदाचा योग्य वापर केला नाही. त्या कारवाईतून माझी निर्दोष मुक्तता झाल्याने या सर्वांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेचा निकाल दि. 6 डिसेंबर 2021 रोजी लागला असून त्यानुसार या चारही अधिकाऱयांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असा निर्णय देण्यात आला आहे. त्यानुसार त्यांच्यावर सातारा न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. त्यामध्ये तत्कालिन जिल्हाधिकारी ओमप्रकाश गुप्ता, तत्कालिन तहसीलदार संजय तेली, सुप्रिया बागवडे व प्रकाश कांबळे यांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.
हे अधिकारीच घोटाळे करतात
माझ्यावर कसलाही दबाव येवू द्या. मी शेवटपर्यंत लढाई लढणार आहे. माझे पुंटुंब यांनी उघडय़ावर आणले आहे. मी तीन महिने जेलमध्ये काढले आहेत. प्रशासनाने खऱयाचा शोध घ्यायला हवा तो घेतला नाही. मी न्यायासाठी लढणार आहे. हे अधिकारीच घोटाळे करतात, असाही आरोप गौतम काकडे यांनी केला आहे.