वृत्तसंस्था / चेन्नई
आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना नवी जबाबदारी मिळाली आहे. तामिळनाडू सरकारने त्यांना आर्थिक सल्लागार परिषदेत सामील केले आहे. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या या सल्लागार परिषदेत अनेक अर्थतज्ञांना सामील करण्यात आले आहे. या परिषदेत राजन यांच्यासोबत एस्थर डफ्लो आणि डॉक्ठर अरविंद सुब्रमणियन यांनाही स्थान मिळाले आहे.
रघुराम राजन हे मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचे टीकाकार राहिले आहेत. तर भारतातील कोरोना संकटासाठी त्यांनी नेतृत्व आणि दूरदर्शीपणाच्या अभावाला जबाबदार धरले होते. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर देशात निर्माण झालेली स्वयंमुग्धतेचा भारताला फटका बसला असल्याचे त्यांनी म्हटले होते.
2013 मध्ये राजन हे आरबीआयचे गव्हर्नर झाले होते. आरबीआय लाभांश आणि व्याजदरांच्या मुद्दय़ांवरून त्यांचे मोदी सरकारसोबत पटले नव्हते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ञ राहिलेल्या राजन यांनी वारंवार मोदी सरकारवर टीका केली आहे.
तामिळनाडू सरकारच्या आर्थिक सल्लागार परिषदेत अरविंद सुब्रमणियन यांनाही स्थान मिळाले आहे. अर्थ मंत्रालयात यापूर्वी मुख्य आर्थिक सल्लागार राहिलेले सुब्रमणियन यांनी जुलै 2020 मध्ये अशोक विद्यापीठात अर्थशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून काम सुरू केले होते. मार्च महिन्यात त्यांनी प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला होता.