प्रतिनिधी/ बेळगाव
मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनपूर्व पावसाने चांगले झोडपल्याने जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या आठवडय़ापासून शेतकरी पेरणी कामात मग्न झालेले दिसून येत आहेत. बेकिनकेरे अतिवाड परिसरात भात पेरणी अंतिम टप्प्यात आली असून पेरणी पूर्ण झालेले शेतकरी बटाटे लागवडीकडे वळलेले दिसून येत आहेत. पश्चिम भागात शेतकऱयांनी बटाटे लागवडीस प्रारंभ केला असून सध्या बटाटे लागवडीला योग्य हवामान असल्याने शेतकऱयांनी बटाटे लागवडीचे काम हाती घेतले आहे.
पश्चिम भागातील उचगाव, बेकिनकेरे, अतिवाड, बसुर्ते, कोनेवाडी, कुदेमनी, कल्लेहोळ, आदी भागात भात पेरणी अंतिम टप्प्यात आली असून बटाटे लागवडीत शेतकरी मग्न झाल्याचे दिसून येत आहेत. बटाटे बियांणाचे वाढत जाणारे भाव, उत्पादनाची अनिश्चितता यामुळे अलिकडच्या काही वर्षात शेतकऱयांच्या कल रताळी वेल लागवडीकडे वळलेला दिसून येत आहे. त्यामुळे गतवषीच्या तुलनेत यंदा बटाटे लागवडीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे लाल व उत्तार जमिनीवर बटाटे लागवड केली जाते.
तालुक्मयाच्या पश्चिम भागात रोप लागवड अधिक प्रमाणात केली जाते. सध्या काही शिवारात पाणी साचून असल्याने शेतकरी रोप लागवडीसाठी भात पेरणी करत आहेत. जमिनीत पुरेसा ओलावा असल्यामुळे शेतकरी बटाटे लागवडीबरोबर इतर पिकांची पेरणी करताना दिसत आहेत.