वृत्तसंस्था/ हांगझोऊ (चीन)
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी या क्रीडा प्रकारात सोमवारी भारताच्या तिरंदाजपटूंनी 6 विविध सांघिक प्रकारात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. बॅडमिंटनमध्ये भारताच्या किदांबी श्रीकांतने पुरुष एकेरी तसेच सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांनी दुहेरीत विजयी सलामी दिली. स्क्वॅश एकेरी प्रकारात पुरुष विभागात भारताच्या सौरव घोषालने उपांत्यपूर्व फेरी गाठली तर महिलांच्या एकेरीत भारातच्या टॉप सिडेड ज्योत्स्ना चिनाप्पाचे आव्हान संपुष्टात आले. कब•ाr या क्रीडा प्रकारात भारतीय महिला संघाने चीन तैपेईला बरोबरीत रोखले.
सांघिक तिरंदाजी या प्रकारामध्ये भारतीय तिरंदाजपटूंनी सोमवारी 6 विविध सांघिक प्रकारात आपली विजयी घौडदौड कायम राखत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या सांघिक कंपाऊंड प्रकारामध्ये भारतीय महिला संघाला उपांत्यपूर्व फेरीसाठी पुढे चाल मिळाली आहे. महिला संघातील ओजस देवतळे आणि ज्योती सुरेखा व्हेनाम यांनी दर्जेदार कामगिरी करत संयुक्त अरब अमिरातचा 159-151 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आता भारताचा पुढील फेरीतील सामना मलेशिया बरोबर होत आहे.
रिकर्व्ह मिश्र दुहेरीच्या तिरंदाजी प्रकारात भारताच्या अतेनु दास आणि अंकिता भक्त यांनी मलेशियाच्या सिक्वेरा एम. आणि मोहम्मद बिन यांचा 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. पुरुषांच्या सांघिक कंपाऊंड प्रकारामध्ये भारताच्या ओजस देवतळे, अभिषेक वर्मा आणि जावकर यांनी सिंगापूरच्या स्पर्धकांचा 235-219 असा पराभव करत शेवटच्या 8 संघात स्थान मिळविले. आता भारताचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना भूतान बरोबर होणार आहे. महिलांच्या सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात भारताला उपांत्यपूर्व फेरीसाठी पुढे चाल मिळाली आहे. तत्पूर्वीच्या सामन्यात भारताने हाँगकाँगचा पराभव केला होता. पुरुषांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारात भारताने हाँगकाँगचा 6-0 असा पराभव करत शेवटच्या 8 संघात स्थान मिळविले आहे. या प्रकारात भारताचा पुढील सामना मंगोलिया बरोबर होणार आहे. महिलांच्या सांघिक रिकर्व्ह प्रकारात भारताने 12 व्या मानांकित थायलंडचा 5-1 असा फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
श्रीकांतची विजयी सलामी
बॅडमिंटन या क्रीडा प्रकारातील पुरुष एकेरीच्या सामन्यात भारताच्या किदांबी श्रीकांतने व्हिएतनामच्या ड्यूकचा 21-10, 21-10 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 29 मिनिटात फडशा पाडत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. श्रीकांतचा पुढील फेरीतील सामना कोरीयाच्या ली गेयूशी होणार आहे. पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी हाँगकाँगच्या लाँग आणि वेई यांचे आव्हान 21-11, 21-16 असे संपुष्टात आणत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मात्र भारताचा बॅडमिंटनपटू एम. आर. अर्जुन आणि रोहन कपूर यांना प्रकृती नादुरुस्तीमुळे माघार घ्यावी लागली आहे.
घोषाल उपांत्यपूर्व फेरीत
स्क्वॅश या क्रीडा प्रकारातील पुरुष एकेरीच्या सामन्यात भारताच्या अनुभवी सौरव घोषालने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना अल्टामिमीचा 11-4, 11-4, 11-6 असा पराभव केला. मात्र महिला एकेरीमध्ये भारताच्या अव्वल ज्योत्स्ना चिनाप्पाला पराभूत व्हावे लागले. दक्षिण कोरीयाच्या मिंगयाँगने चिनाप्पाचा केवळ 37 मिनिटात 3-1 अशा गेम्समध्ये पराभव करत पुढील फेरी गाठली. या पराभवामुळे चिनाप्पाला या स्पर्धेत एकेरीत पदकविना रहावे लागले आहे. मात्र तिने या स्पर्धेत सांघिक प्रकारात 2 रौप्य आणि 2 कांस्यपदके मिळविली आहेत. भारताच्या तन्वी खन्नाने उपांत्यपूर्व फेरी गाठताना थायलंडच्या सी. अरिचेयावर 11-1, 11-3, 11-2 अशी मात केली. मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या अनहात सिंग आणि अभय सिंग यांनी आपली विजयी घौडदौड कायम राखताना थायलंडच्या जोडीचा 11-5, 11-6 असा पराभव केला. महेश मानगावकरने एकेरीच्या सामन्यात सुकूईवर 3-0 असा विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
भारतीय महिला कब•ाr संघाला सोमवारी झालेल्या अ गटातील सामन्यात चीन तैपेईने 34-34 अशा गुणांनी बरोबरीत रोखले. या सामन्यात भारतीय संघाला गुण मिळविताना चांगलेच अवघड गेले होते. भारतीय महिला संघाचा पुढील सामना मंगळवारी दक्षिण कोरीया बरोबर होणार आहे. तर पुरुषांच्या कब•ाrत भारताचा अ गटातील सामना बांगलादेश बरोबर होत आहे.