नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना संकटाच्यादृष्टीने देशात आगामी 100 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोरोनाच्या तिसऱया लाटेला रोखण्याकरता पुढचे 100 ते 125 दिवस खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशाची कोरोनाविषयक चिंता वाढवणाऱया सहा राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. त्यामुळे नजिकच्या काळात आरोग्य यंत्रणांना पुढील दोन-तीन महिने सतर्क राहून ‘मिशन हंड्रेड डेज्’ मोहीम राबवावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी अनलॉक प्रक्रिया सुरु करण्यात आली. मात्र निर्बंधात शिथिलता देण्यात आल्याने नागरिकांचा हलगर्जीपणा वाढला आहे. मात्र कोरोना व्हायरसची तिसरी लाट टाळण्यासाठी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग, हातांची स्वच्छता, लसीकरण यांसारख्या कोरोना नियमांच्या पालनाने तिसऱया लाटेची गंभीरता कमी होऊ शकते. अन्यथा धोका वाढू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र, केरळ, ओडिशा, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश या सहा राज्यांमधील पुढचे शंभर दिवस कसे असतील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना आढावा बैठकीत या सहा राज्यांमधील रुग्णसंख्या वाढीविषयी चिंता व्यक्त केली आहे. पुढच्या 100 दिवसांत या सहा राज्यांनी कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवली तर देशासमोरचे लाटेचे संकट टळू शकेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही म्हटले आहे.
देशातील नागरिक अद्यापही असुरक्षित आहेत. आपण अजूनपर्यंत हर्ड इम्युनिटी पर्यंत पोहचलेलो नाही. लसीकरण सातत्याने वाढत असले तरी अद्याप आपण सर्वजण सुरक्षित नसल्याचे केंद्राने म्हटले आहे. सध्या स्थिती नियंत्रणात असली तरी ही परिस्थिती कायम ठेवणे गरजेचे आहे आणि कोरोना नियमांचे पालन केल्याने ते शक्मय होईल, असेही केंद्राकडून सांगण्यात आले आहे. कोरोना संकट अद्याप कायम आहे. काही जिल्हे, राज्य आणि भागांमध्ये कोरोनाचा धोका अधिक आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहणे गरजेचे आहे. नियंत्रणात असलेली परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, याची काळजी घेणे आपल्याच हातात असल्याचे केंद्राने म्हटले आहे.