‘मसालाकिंग धनंजय दातार’ बनले देवदूत : सौदीच्या तुरुंगात अडकलेल्या 700 भारतीयांची केली सुटका
सुभाष देशमुखे / कराड
काही व्यक्ती आपल्या आयुष्याचा मार्ग स्वतःच निवडतात. काही व्यक्तींसाठी तो इतरांनी ठरवलेला असतो… तर काही व्यक्ती अशा असतात ज्यांना त्यांच्या आयुष्यातलं ध्येय अगदी अचानक गवसतं… डॉ. धनंजय दातार हे असेच एक नाव… ज्यांच्या आयुष्यात अपयश जणू ठाण मांडूनच बसले होते. या अपयशाच्या छाताडावर बसून आज ते यशाच्या शिखरावर तर आहेतच, पण श्रीमंतांच्या यादीतही त्यांचे नाव ठळकपणे कोरलेय… आखाती देशातील श्रीमंतांच्या पंगतीत बसूनही या व्यक्तीचे पाय जमिनीवर आणि नजर सर्वसामान्यांवर आहे. नुकतेच सौदी अरेबियाच्या तुरूंगवासात अडकलेल्या 700 भारतीयांची सुटका करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या 700 भारतीयांसाठी देवदूत बनून आलेले मसालाकिंग डॉ. धनंजय दातार आज नव्या पिढीच्या स्टेटस, प्रोफाईलवर झळकू लागले आहेत.
कोरोनाच्या संकटाने प्रत्येकाचेच जगणे बदलून गेले आहे. जसे जगणे बदलले आहे तसे ध्येय, आशा, आकांक्षांवरही पाणी फिरले आहे. सौदी अरेबियात जेद्दाह येथे करिअर घडवण्यासाठी गेलेल्या काही भारतीयांनाही कोरोनाच्या संकटाने अक्षरशः रस्त्यावर आणले. सौदी अरेबियातील कायद्यामुळे त्यांचे रस्त्यावरील जगणेही अवघड बनल्याने त्यांना तुरूंगवासात अडकावे लागले. तुरूंगातील चार भिंतींशिवाय त्यांचा टाहो ऐकायलाही कोणी मिळेना. आखाती देशात उद्योग व्यवसाय, कंपनीच्या बैठकांमध्ये व्यग्र असलेल्या डॉ. धनंजय दातार यांच्या कानी हे वृत्त पडताच त्यांनी भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. दुबईतील भारतीय वाणिज्य दुतावासामार्फत (कॉन्सुलेट) जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दुतावासाशी संपर्क साधला. तसेच त्यांचा प्रवासखर्च उचलण्याची तयारी दर्शवली. त्यांनी दाखवलेल्या माणुसकीला आणि मोठेपणाला सौदी अरेबियातील प्रशासकीय व्यवस्थेने सलाम ठोकला. डॉ. दातार यांच्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद देत 700 भारतीयांची सुटका केली.
भारत व सौदी अरेबियादरम्यान सध्या विमान वाहतूक बंद असल्याने सौदी प्रशासनाने आणखी सहकार्य करत या सर्व कामगारांना आपल्या ‘सौदीया एअरलाईन्स’ या अधिकृत विमानसेवेद्वारे भारतात आणून पोचवले, तर कामगारांची जेद्दाह विमानतळापर्यंत वाहतूक, वैद्यकीय तपासणी व खाण्या-पिण्याची पूर्ण जबाबदारी डॉ. दातार यांच्या सहकाऱयांनी सांभाळली. यातील 451 कामगार ‘सौदीया एअरलाईन्स’च्या 2 विशेष फ्लाईट्समधून दिल्ली विमानतळावर तर उर्वरित 250 कामगार कोची विमानतळावर उतरले.
भारतीय कामगारांसाठी मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी दाखवलेली संवेदनशीलता ही त्यांच्या देशप्रेमाचे प्रतिक आहे. ‘सामान्य कुटुंबातील धनंजय दातार याच स्वभावगुणांमुळे मसालाकिंग डॉ. धनंजय दातार बनले… श्रीमंतांच्या यादीत विराजमान झाले’.
अजूनही अडकलेल्या भारतीयांना मदत करणार : डॉ. दातार
डॉ. धनंजय दातार म्हणाले, सौदीत अडकलेल्या भारतीयांची अवस्था बिकट होती. ते त्यांच्या कुटुंबात परत जायला हवेत ही भावना स्वस्थ बसू देत नव्हती. या संवेदनशील भावनेतूनच त्यांना भारतात पाठवण्यासाठी प्रयत्न केले. मायदेशी परतल्यानंतरचे त्यांचे समाधानी चेहरे हा मोठा आशिर्वाद आहे. अजूनही परदेशात काही भारतीय अडकले असून त्यांचाही शोध घेऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे सांगितले.