विनायक भोसले/ कोल्हापूर
दिग्गज बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत यंदा तरी ऑल्मिपक जिंकणार का, असा प्रश्न बॅडमिंटन चाहते विचारत आहेत. सध्याची दोघींची कामगिरी पाहता, हा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक आहे. आता सिंधू-सायना खेळत असलेल्या बहुतेक स्पर्धांचा दर्जा कमालीचा उच्च असतो. त्यात सातत्याने कोणालाच यश मिळत नाही, तरीही या दोघींकडून प्रत्येक स्पर्धेत भारताला जेतेपद हवे असते. अलीकडील काळात जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडू दमत आहेत आणि त्याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होत असल्याचा सूर व्यक्त केला जात आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये सिंधूने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले, यानंतर तिला सहा महिन्यात एकाही स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नाही. सायनाच्या बाबतीतही असेच आहे. गतवर्षी इंडोनेशियन ओपनचे जेतेपद वगळता तिला एकाही स्पर्धेत यश मिळालेले नाही. आता, ती टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरणार का, याबाबत सांशकता व्यक्त केली जात आहे.
अतिखेळामुळे खेळाडू थकले आहेत, बॅडमिंटन कोर्टवर त्यांची दमछाक होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये सिंधूने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे अजिंक्यपद पटकावण्याची कामगिरी केली. यानंतर, 25 ऑगस्ट 2019 ते 25 जानेवारी 2020 या कालावधीत तिने सात प्रमुख स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. यापैकी एकाही स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तिला प्रवेश मिळवता आला नाही. जागतिक मानांकनातही तिची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. जागतिक स्पर्धा जिंकल्यानंतर सिंधूच्या कामगिरीत घसरण का झाली, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. या सहा महिन्यांच्या कालावधीत चीन, कोरिया, डेन्मार्क, फ्रान्स, हाँगकाँग, इंडोनेशिया, मलेशिया मास्टर्स स्पर्धेत ती सहभागी झाली. या दरम्यान कमी विश्रांती, सरावासाठी पुरेसा वेळ न मिळणे, प्रवासाची दगदग. या साऱया बाबी म्हणजे एक चक्रव्यूहच. ते भेदणे केवळ सिंधूलाच नव्हे तर जगातील प्रमुख बॅडमिंटनटपटूंना कठीण ठरत आहे.
सायनाचे अपयश चिंताजनक
दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर सायना नेहवालचे अपयश ही चिंताजनक बाब मानली जात आहे. गतवर्षी जानेवारीत सायनाने इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद पटकावले. यानंतर, तिला आतापर्यंत एकाही स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आलेली नाही. याशिवाय, जागतिक मानांकनातही तिची 22 व्या स्थानापर्यंत घसरण झाली आहे. यामुळे आगामी ऑलिम्पिक स्पर्धेला ती पात्र ठरणार की नाही, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी जागतिक मानांकन यादीत 16 वे स्थान असणे आवश्यक आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी एप्रिलअखेरची मुदत असून या कालावधीत आठ स्पर्धा होणार आहेत. यामुळे सायना ऑलिम्पिक खेळणार का, हे पहावे लागेल.
सायना जिगरबाज आहे. तिने भारतीय बॅडमिंटनला नवी दिशा दिली आहे. मात्र अतिखेळण्याचा त्रास तिलाही होत आहे. अलीकडील काळातील तिच्या कामगिरीवरुन हे दिसत आहे. मागील इतिहास पाहता सायनाने प्रत्येक कठीण प्रसंगातून मार्ग काढत पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. यामुळे आगामी काळात भारतीय चाहत्यांना तिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
पुरुष खेळाडूंकडेही लक्ष हवे
सायना नेहवाल, सिंधू भारतीय बॅडमिंटनसाठी महत्वाच्या आहेत, पण या दोघी म्हणजे भारतीय बॅडमिंटन नव्हे. अलीकडील काळात किदाम्बी श्रीकांत, बीसाई प्रणित, पारुपल्ली कश्यप, समीर वर्मा, लक्ष्य सेन, प्रणॉय यांनीही दमदार कामगिरी साकारली आहे. पण, या युवा खेळाडूंत सातत्य नसल्याचे दिसून येत आहे. श्रीकांत, साई प्रणित यांनी मागील दोन वर्षाच्या कालावधीत यश नक्कीच मिळवले आहे, पण चिनी, कोरियन, जापनीज खेळाडूंसमोर भारताचे खेळाडू अपयशी ठरतात, ही बाब नक्कीच वेदनादायी आहे. या साऱया अपयशातून प्रेरणा घेत पुरुष बॅडमिंटनपटूंनी चांगली कामगिरी करण्यावर भर देण्याची गरज जाणवू लागली आहे.
ऑलिम्पिक पदक जिंकणार?
बॅडमिंटन हा भारतासाठी पदकविजेता खेळ आहे. 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्यपदक जिंकले. यात प्रगती साधत 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्य पटकावले. आता मार्चमध्ये सायना 30 वर्षाची तर सिंधू 25 वर्षाची होईल. आगामी ऑलिम्पिकमध्ये सिंधूकडून नक्कीच पदकाची अपेक्षा असेल. पुरुष एकेरीत सध्या किदाम्बी श्रीकांत, प्रणॉय, साई प्रणित, समीर वर्मा हे टॉप-20 खेळाडूंत आहेत. यांच्याकडून टोकियोमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.