आम आदमी पक्षाचा दावा : चर्च पाडण्याच्या कृतीचा ‘आप’कडून निषेध
प्रतिनिधी / मडगाव
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गोवा भेटीवर येत असल्याची संधी साधून दक्षिण दिल्लीतील चर्च पाडण्याचे षडयंत्र भाजपने रचले. जेणेकरून अरविंद केजरीवाल यांची गोव्यात प्रतिमा मलिन व्हावी. परंतु, अरविंद केजरीवाल यांनी कधीच जाती-धर्माचा भेदभाव केलेला नाही. सर्व धर्मांतील लोकांना सोबत घेऊन ते पुढे जात आहे असा दावा काल आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्यांनी मडगावात केला.
दिल्लीत चर्च पाडण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी काल आपचे कार्यकर्ते मडगावात एकत्र आले होते. त्यांनी दक्षिण गोव्यातील भाजपच्या कार्यलयासमोर रस्त्यावर उभे राहून निषेध केला. यावेळी बोलताना जेम्स म्हणाले की, दिल्लीतील लिटल फ्लोवर चर्च पाडण्याचे काम दिल्ली विकास प्राधिकरणाने केले, आणि हे दिल्ली विकास प्राधिकरण हे थेट केंद्र सरकारच्या गृहमंत्र्यालयाच्या खाली कार्यरत आहे. मात्र, चर्च पाडण्याचे खापर अरविंद केजरीवाल फोडले जात आहे ते केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठीच.
दिल्ली विकास प्राधिकरणाचे प्रमुख हे राज्यपाल असतात व या राज्यपालाची नियुक्ती केंद्रीय गृहमंत्र्यालया तर्फे केली जाते, त्याचा दिल्लीत सरकारशी काहीच संबंध येत नाही. राज्यपालांनी ही चर्च पाडण्याचा आदेश दिल्याने चर्चवर कारवाई झाली. हे सर्व भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप जेम्स यांनी केला.
गोव्यात आपला मिळत असलेला प्रतिसाद पाहून सद्या भाजप व भाजपची बी टीम बिथरलेली आहे. त्यामुळे अशी कटकारस्थाने रचण्यात ते गुंतले असल्याचा आरोप आपच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी केला. चर्च पाडण्याचा आदेश हा न्यायालयाने दिला होता. या आदेशावर दिल्ली विकास प्राधिकरणाने शिक्का मोर्तब केले. दिल्ली विकास प्राधिकरणावर नियुक्त असलेले राज्यपाल व चार पदाधिकारी हे भाजपचेच आहे. केवळ दोन सदस्य हे आपचे आहेत. त्यामुळे एकूण परिस्थिती स्पष्ट होत असल्याचे प्रतिमा कुतिन्होने म्हणाल्या.
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे सर्वांना सोबत घेऊन जात आहे. त्याचा धसका काँग्रेस व भाजप यांनी घेतला आहे. म्हणूनच आम आदमी पक्षाला बदनाम करण्याचे कारस्थान रचण्यात आल्याचा दावा कॅप्टन व्हेन्सी यांनी केला.