मतदान 8 फेब्रुवारी तर मतगणना 11 फेब्रुवारी, आचारसंहिता लागू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. विधानसभेच्या सर्व 70 जागांसाठी येत्या 8 पेबुवारीला मतदान होणार असून मतगणना 11 फेब्रुवारीला होत आहे. निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सुनिल अरोरा यांनी सोमवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही घोषणा होताक्षणीच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सध्या या राज्यात आम आदमी पक्षाचे राज्य आहे.
सध्याच्या विधानसभेचा कालावधी 22 फेब्रुवारीपर्यंत आहे. या कालावधीआधी नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. आयोगाच्या घोषणेचे प्रमुख राजकीय पक्षांनी स्वागत केले असून निवडणूक योग्य वातावरणात पार पडावी अशी अपेक्षा व्यक्त केली. भाजप व आम आदमी पक्ष यांच्यात या निवडणुकीत प्रमुख लढत आहे, असे मानले जात आहे.
सामाजिक, राजकीय मुद्दे
दिल्लीतील वायूप्रदूषण, महिलांची सुरक्षा, पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी, राष्ट्रीय नागरीक सूची आणि नागरीकत्व कायदा सुधारणा हे या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे असतील अशी शक्यता आहे. याशिवाय, पाणीपुरवठा. अनधिकृत वसाहती अधिकृत करणे, शिक्षण, आरोग्य सेवा हे मुद्देही महत्वाचे ठरणार आहेत.
युती होणार का ?
आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँगेस हे या निवडणुकीतील प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष आहेत. या शिवाय अकाली दल आाणि अन्य छेटे पक्ष आहेत. हे पक्ष युती करून लढणार की स्वतंत्ररित्या हे लवकरच स्पष्ट होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी आम आदमी पक्ष आणि काँगेस यांच्यात युती होण्याची वातावरण होते. तथापि, अखेरीस युती झाली नाही. विधानसभा निवडणूक मात्र तीन्ही प्रमुख पक्ष स्वतंत्ररित्या लढणार असे दिसत आहे. मात्र भाजपची अकाली दलाशी युती होऊ शकते असे वातावरण आहे.
असा असेल कार्यक्रम
अधिसूचना 14 जानेवारी 2020
अर्ज सादरीकरण 21 जानेवारी 2020
मतदान 8 फेब्रुवारी 2020
मतगणना 11 फेब्रुवारी 2020
आचारसंहिता लागू 7 जानेवारी 2020
बॉक्स
निवडणूक आकडय़ात…
मतदारसंख्या 1 कोटी 46 लाख 92 हजार 136
मतदान केंद्रे 13 हजार 750
कर्मचारी संख्या 90 हजार हून अधिक
बॉक्स
2015 चे पक्षीय बलाबल
एकंदर स्थाने 70
आम आदमी पक्ष 67
भारतीय जनता पक्ष 3
काँगेस 0
अन्य, अपक्ष 0