नगराध्यक्षा प्रणाली माने यांची माहिती
प्रतिनिधी / देवगड:
देवगड-जामसंडे नगरपंचायतीला स्वच्छतेमध्ये यापूर्वीच टू स्टार नामांकन प्राप्त झाले आहे. यावेळी नगरपंचायत थ्री स्टार व ओडिएफ प्लस प्लसच्या नामांकनासाठी सज्ज झाली आहे. देवगड-जामसंडे शहराला उच्चत्तम क्रमांक प्राप्त होण्यासाठी शहरातील नागरिकांनी शहर स्वच्छ सुंदर व हरित ठेवून आपले शहर स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन नगराध्यक्षा सौ. प्रणाली माने यांनी केले आहे.
नगराध्यक्षा माने म्हणाल्या, नगरपंचायत स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये सहभागी झाली असून गतवर्षी जनतेने दिलेल्या अनमोल सहकार्यामुळेच 2019 मध्ये नगरपंचायतीला पश्चिम भारतात 81 वा, महाराष्ट्रात 64 वा तर सिंधुदुर्ग जिल्हय़ात प्रथम क्रमांक मिळाला होता. यावर्षी देवगड जामसंडे नगरपंचायत स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत संपूर्ण भारतात पहिल्या 50 क्रमांकामध्ये आणण्याचा मानस आहे. त्या अनुषंगाने नगरपंचायतीमार्फत शहरात विविध कार्यक्रमांतर्गत जनजागृती, साफसफाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रभागवार पथनाटय़, रॅली, घरोघरी जाऊन माहिती देणे, पत्रके वाटप करणे इत्यादी गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
बालोद्यान येथे अवकाशात स्वच्छतेचा बलून
देवगड बालोद्यान येथे स्वच्छ सर्वेक्षण 2020 सुरू असल्याबाबत नागरिकांना ज्ञात व्हावे, यासाठी अथांग बलून अवकाशात सोडण्यात आला आहे. तर खाकशीतिठा, जामसंडे बाजारपेठ, कॉलेज नाका, वाडातर पूल, तारामुंबरी पूल या ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर लाऊडस्पिकरद्वारे प्रत्येक प्रभागात आवाहन करून एलईडी व्हॅनद्वारे स्वच्छतेची जनजागृती करण्यात येत आहे.
कापडी पिशव्यांचे होणार वाटप
नगरपंचायतस्तरावर स्वच्छतेविषयक आवश्यक बाबींची पूर्तता करून देण्यात येत आहे. यासाठी शहरातील ओल्या कचऱयापासून नगरपंचायत कंपोस्टिंग प्रक्रिया करून निर्मिती करीत आहे. सुका कचरा पुनःवापराकरिता वापरण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, यासाठी देवगड-जामसंडे न. पं. कडून प्रत्येक प्रभगात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. देवगड-जामसंडे शहर हागंदारीमुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आले असून शहराला ओडीएफ प्लस दर्जा प्राप्त झाला आहे. शहराला थ्री स्टार व ओडीएफ प्लस प्लस प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन नगरपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन सौ. माने यांनी केले.