चोवीस तासात 45,674 नवे पॉझिटिव्ह : 559 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे दिसत आहे. देशात कोरोना संक्रमितांचा आकडा 85 लाखांच्या पुढे पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी जारी केलेल्या आकडय़ांनुसार, मागील चोवीस तासात कोरोना संसर्गाच्या 45 हजार 674 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 559 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात मागील 24 तासात 11 लाख 94 हजार 487 कोरोना तपासण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.
देशात आतापर्यंतची कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 85 लाख 07 हजार 754 वर पोहोचली आहे. एकूण रुग्णांपैकी 78 लाख 68 हजार 968 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. अजूनही देशात सध्या 5 लाख 12 हजार 665 सक्रिय रुग्ण आहेत. मागील चोवीस तासात पुन्हा एकदा पाचशेहून अधिक जणांचा बळी गेल्यामुळे एकूण मृतांचा आकडा 1 लाख 26 हजार 121 झाला आहे.
दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन शहरांमध्ये कोरोना संसर्ग झपाटय़ाने वाढत आहे. दिल्लीत रविवारी 6 हजार 953 नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यानंतर संक्रमितांची संख्या वाढून 4 लाख 30 हजार 784 झाली आहे. आरोग्य विभागानुसार, या महामारीमुळे आणखी 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागानुसार सध्या 40 हजार 258 रुग्णांवर उपचार सुरू आहे. महाराष्ट्रात दिवसभरात कोरोना विषाणू संसर्गाची 3,959 नवी प्रकरणे समोर आली असून संक्रमितांचा एकूण आकडा वाढून 17 लाख 14 हजार 273 झाला आहे. दिवसभरात कोरोनामुळे 150 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतच्या एकूण मृतांची संख्या वाढून 45 हजार 115 झाली आहे.