सर्वसाधारणपणे उडते प्रवासी विमान बेपत्ता होणे ही गंभीर दुर्घटना मानली जाते. बहुतेक वेळा बेपत्ता विमान कुठेतरी कोसळते आणि सर्व प्रवासी प्राणास मुकतात. तथापि, रशियातील एका विमानाचा असाच प्रकार होऊनही त्यातील सर्व प्रवासी सुखरुप राहिल्याची सुखद घटना नुकतीच घडली आहे.
गेल्या शुक्रवारी या विमानाने उड्डाण केले. काही वेळातच त्याचा मुख्य विमानतळाशी संपर्क तुटला. बराच काळ तो प्रस्थापित झाला नाही. रशियाच्या वायु दलाने विमानाचा शोध घेणारी यंत्रणा क्रियान्वित केली. वाट चुकलेले हे विमान सायबेरियाच्या बर्फाळ प्रदेशात विमानचालकाने कसेबसे उतरविले होते. बर्फाळ प्रदेश असल्याने क्रॅशलँडिंग केल्यानंतरही विमानाचे फारसे नुकसान झाले नाही. तसेच मोठा धक्का बसूनही आतील सर्व प्रवासी आणि विमानचालक तसेच विमानाचे कर्मचारी सुखरुप राहिले. काही जणांना किरकोळ जखमा झाल्या. तर काही जणांची प्रकृती मानसिक धक्क्मयाने बिघडली. क्रॅशलँडिंग केल्यानंतर सहा तासात विमानाच्या स्थानाचा पत्ता लागला. त्वरित साहाय्य पाठविण्यात आले व प्रवासी आणि विमान कर्मचाऱयांना सुरक्षितस्थळी आणण्यात आले. या विमानात 14 प्रवासी तसेच पाच कर्मचारी होते. प्रवाशांमध्ये काही मुलांचाही समावेश होता.