नीना गुप्ता यांच्या अभिनयाने नटलेला ‘द लास्ट कलर’ या चित्रपटाला 92 व्या अकॅडमी अवॉर्डसाठी (ऑस्कर) सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मच्या शेणीचे नामांकन मिळाले आहे. दिग्दर्शक विकास खन्ना यांनी ऑस्करची यादी प्रसारित करत ट्विटरवर आनंद व्यक्त केला आहे. 2020 ची सर्वात चांगली सुरुवात झाल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
हे यश पचविण्यासाठी मला काही काळ द्यावा लागणार आहे. पण हा क्षण माझ्यासाठी सर्वोत्तम आहे. माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल नीना गुप्ता यांचे आभार मानत असल्याचे खन्ना यांनी म्हटले आहे.
वृंदावनवरील महिलांवर आधारित
चित्रपटात वृंदावन आणि वाराणसी येथील विधवा महिलांसंबंधी मानसिकता दर्शविण्यात आली आहे. नीना यांनी 70 वर्षीय विधवा नूर हे पात्र साकारले आहे. चित्रपटाची कथा नूर आणि 9 वर्षीय छोटी या पात्रांभोवती फिरते. शाळेत जाण्याचे स्वप्न पाहणारी बेघर तसेच अनाथ छोटी उदरनिर्वाहासाठी फुलांची विक्री करत असते. छोटीच्या स्वप्नांच्या पूर्ततेत नूर कशी हातभार लावते आणि विधवा असल्याने तिला कुठला त्रास सहन करावा लागतो हे चित्रपटात मांडण्यात आले आहे.