उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी नवी दिल्लीतील शिष्टमंडळाच्या बैठकांनंतर दिलेली माहिती
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
गोव्यातील धनगर समाजाला एसटी दर्जा मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर प्रयत्नशील असून बुधवारी नवी दिल्ली येथे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (आरजीआय) विवेक जोशी यांच्याशी त्यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाने चर्चा केली. धनगर समाजाला एसटी दर्जा मिळवून देण्याच्या बाबतीत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच धनगर समाजाला एसटी दर्जा मिळेल, अशी माहिती कवळेकर यांनी बैठकांनंतर दिली.
धनगर समाजाला एसटी दर्जा मिळावा यासाठी याआधी अनेक वेळा आंदोलने व बैठकाही झाल्या आहेत. धनगर समाजाला एसटी दर्जा प्राप्त झाल्यास राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा फायदा या समाजाला घेता येणार आहे. तसेच धनगर समाजाला आर्थिक, सामाजिकदृष्टय़ाही फायदा होणार आहे. केपेचे आमदार कवळेकर हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर धनगर समाजाच्या या मागणीला आणखी जोर आलेला आहे.
धनगर समाजाला एसटी दर्जा देण्याच्या बाबतीत एन. डी. अगरवाल यांच्याकडून याआधी तयार करण्यात आलेल्या अहवालातील काही मुद्यांवर आरजीआयच्या कार्यालयाने स्पष्टीकरण मागितले होते. मंत्री कवळेकर यांच्या नेतृत्वाखालील धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने याआधी एकदा नवी दिल्लीला जाऊन विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या होत्या तसेच धनगर समाजाला एसटी दर्जा मिळण्याबाबत चर्चा केली होती व बैठकाही झाल्या होत्या.
कृती योजना तयार करण्याचा निर्णय
बुधवारी पुन्हा एकदा नवी दिल्ली येथील नॉर्थ ब्लॉकमधील गृह मंत्रालयात पहिली बैठक आरजीआय विवेक जोशी आणि त्यांच्या 3 वरि÷ अधिकाऱयांसमवेत झाली. यावेळी उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्या नेतृत्वाखालील एन. डी. अगरवाल, डॉ. जनो झोरे व चंद्रकांत शिंदे यांचा समावेश असलेले शिष्टमंडळ उपस्थित होते. त्यांच्यासोबत समाजकल्याण खात्याचे सचिव राजशेखर उपस्थित होते. धनगर समाजाला एसटी दर्जा मिळण्याची गरज का आहे याची माहिती देतानाच एसटी दर्जा देण्याच्या बाबतीत येणाऱया अडचणींवर चर्चा करण्यात आली. ठरावीक कालावधीत धनगर समाजाला एसटी दर्जा मिळावा यासाठी कृती योजना तयार करण्याचे व त्यानुसार कार्य करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.
लवकरात लवकर एसटी दर्जा मिळणार
यानंतर दुसरी बैठक आरजीआयच्या एनडीआरएफ ग्रीन्स येथील कार्यालयात झाली. या बैठकीत सर्व विषयांवर चर्चा झाली. तसेच एसटी दर्जाचा विषय निकाली काढण्याकरिता रणनीती आखण्यात आली. उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी बैठकीनंतर सांगितले की, धनगर समाजाला एसटी दर्जा मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील असून आरजीआयसोबत यासंदर्भात सकारात्मक चर्चा झालेली आहे. सदर दर्जा देण्याच्या बाबतीत येणाऱया तांत्रिक अडचणींवर तोडगा काढण्यात येईल व लवकरात लवकर राज्यातील धनगर समाजाला एसटी दर्जा प्राप्त होईल, असे त्यांनी सांगितले.