प्रतिनिधी/ सातारा
काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा प्रत्यय सातारा पालिकेच्या बाबतीत येत आहे. सातारा शहर स्वच्छतेच्या नुसत्याच बढाया मारल्या जातात. खुर्चीत बसल्यानंतर मात्र कामाचा काहीच पत्ता नाही. अशी अवस्था निर्माण झाल्याने पालिकेच्या दिव्याखालीच अंधार पडल्याचे चित्र गेल्या चार दिवसांपासून पालिकेच्या कर्मचाऱयांना अनुभवायला मिळत आहे. स्वच्छतागृह तुंबून तब्बल चार दिवस झाले तरीही पालिका प्रशासन डाराडुर आहे. पालिका कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
सातारा शहरात प्रभागातील स्वच्छतेकडे तसे थोडेसे दुर्लक्षच आहे. तरीही स्वच्छ भारत अभियानात सातारा शहराचे नाव झळकवण्यासाठी सातारा पुढे कसा येईल यासाठी आरोग्य विभागाची नुसतीच वरवरची धडपड पहायला मिळते आहे. पालिकेच्या मुख्य इमारतीतच गेल्या दीड वर्षापासून सातारकर नागरिकांनी उठाव केल्यानंतर स्वच्छतागृहसाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च करुन स्टाईलची फरशी बसवून स्वच्छतागृह चांगले केले होते. परंतु तेच स्वच्छतागृह गेल्या चार दिवसांपासून तुंबले गेले आहे. एकच पालिकेचा कर्मचारी त्याचे स्वच्छता करतो परंतु तोही हे स्वच्छतागृह तुंबले गेल्यामुळे वैतागला आहे. स्वच्छतागृह तुंबल्यामुळे पालिका कर्मचाऱयांना आता इतर ठिकाणचा शोध घ्यावा लागत आहे. त्यामुळे पालिका कर्मचारी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पालिकेच्या पदाधिकाऱयांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
पालिकेने नुसते मिरवू नये
काखेला कळसा अन् गावाला वळसा, याचाच प्रत्यय येतो आहे. नगरपालिका स्वच्छ सुंदर ठेवू शकत नाही. स्वच्छ सातारा करण्यामध्ये पाहलिकेची उदासिनता असताना आता मुळातच नगरपालिकेमध्येच अस्वच्छतेचे सामाज्य्र आहे.
चंद्रकांत खंडाईत अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष
पालिका कर्मचाऱयांच्या आरोग्याची काळजी नाही
जे कर्मचारी शहराच्या स्वच्छतेकरता झटतात. काम करतात. त्यांच्या आरोग्याची काळजी पालिकेच्या प्रशासनाला नसेल तर खूप खेद वाटतो एक सातारकर म्हणून. पालिकेने योग्य वेळीच तातडीने दखल घेणे उचित ठरेल. पालिकेच्या मुख्य इमारतीतच स्वच्छतागृहाची अशी दुरावस्था असेल तर शहरातील काय असेल.