प्रतिनिधी/ पर्वरी
देशात सध्या नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून जो काही गेंधळ सुरू आहे तो पाहता या देशाचा एक नागरिक म्हणून खुप दुःख होते. आपण सुशिक्षित असूनही निरक्षरांप्रमाणे वागतो आहोत. या विधेयकाविरोधातील आंदोलने आणि ज्या काही धार्मिक दंगली पेटविल्या जात आहेत ते पाहून क्लेश होतो. हे विरोधकांचे पाप आहे. ज्या धर्मनिरपेक्षतेचा डंका पिटवला जातोय तो फसवा आहे. ज्या दिवशी पाकव्याप्त काश्मिर भारतात येईल, पाकवृत्तीचा नाश होईल, या देशात प्रत्येक हिंदूना हम दो हमारे दो असे अभिमानाने म्हणता येईल आणि समान नागरिकत्व कायदा अमलात येईल तेव्हाच हा देश खऱयाअर्थाने धर्मनिरेक्ष देश होईल, असे रोखठोक प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते, थोरविचारवंत राहूल सोलापूरकर यांनी शारदा व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना व्यक्त केले.
जनहित मंडळ पर्वरी व भारत विकास परिषद पर्वरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बाराव्या शारदा व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. विद्या प्रबोधिनी विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या व्याख्यानमालेच्या दुसऱया दिवशीचा शुभारंभ दिप प्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते राहूल सोलापूरकर यांच्यासह व्यासपीठावर भारत विकास परिषदेचे अध्यक्ष प्रदीप लोटलीकर, जनहित मंडळ पर्वरीचे अध्यक्ष भिवा मळीक, साळगावकर लॉ कॉलेजचे व्यवस्थापक, प्रा. ज्ञानेश्वर पेडणेकर आदी मान्यवर अपस्थित होते. प्रमुख मान्यवर पेडणेकर यांचा परिचय व्याख्यानमालेचे पदाधिकारी म्हाळसाकांत देशपांडे यांनी तर प्रमुख वक्ते सोलापूरकर यांचा परिचय सिताराम कोरगावकर यांनी करून दिला.
नागरिकत्क दुरूस्ती विधेयक आणि राष्ट्रीय जनगणना या सध्या देशात गाजत असलेल्या विषयावर आपले परखड मत व्यक्त करताना सोलापूरकर यांनी उपस्थित श्रोत्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यास भाग पाडले. देशाचे नागरिक म्हणून प्रत्येकाचे आपल्या देशाप्रती काय कर्तव्य असायला हवे, आपण किती जागृक असायला हवे, आणि आपले देशासाठीपण काय देणे घेणे आहे याची प्रत्येकाला जाणीव करून देण्यात ते यशस्वी झाले. नागरिकत्व विधेयकावरून विरोधकांकडून सध्या देशात ज्या काही देशविरोधी कारवाव्या चालू आहेत त्यावर जोरदार प्रहार त्यांनी आपल्या व्याख्यानातून केला.
ते म्हणाले, फरहान अख्तरसारखा प्रसिद्ध अभिनेता जेव्हा केवळ मुस्लिमांचा प्रश्न आहे या गैरभावनेतून झुंडीचा भाग होऊन नागरिकत्व विधेयकाविरोधातील रॅलीत उतरतो तेव्हा ही बाब गंभीर आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. पत्रकार फरहानला हे आंदोलन कशासाठी चाललेय असा प्रश्न करतात तेव्हा तो निरुत्तर होतो. कशासाठी याचे नेमके उत्तर त्याला देता येईना. आपण झुंडीचा भाग झालोय असे उत्तर तो देतो तेव्हा हा प्रकार गंभीर असल्याचे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. विरोधक सध्या नागरिकत्व विधेयक कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे असा गैरसमज देशभरात निर्माण करत आहेत. यावरून धार्मिक तेढ निर्माण करण्यात ते यशस्वी ठरत आहेत. यावरून ही आंदोलने उत्स्फूर्त नाहीत तर ती मुद्दाम घडवून येत असलेल्या दंगलीची चाहूल आहे हे या देशातील प्रत्येकाने ओळखणे गरजेचे बनले आहे. अन्यथा या देशात पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम वाद उफाळून येऊन माणसामाणसांमध्ये तिरस्काराची भावना निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, असे ते म्हणाले.
मुळात हे विधेयक देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे. नेमका कायदा काय आहे. त्यातील कलमांचा अर्थ काय? याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तसे केल्यास विरोधकांकडून निर्माण केलेल्या गैरसमजाचा फारसा प्रभाव पडणार नाही. धार्मिक क्लेशामुळे भारताच्या लगत असलेल्या देशातील हिंदू, बौध्द, ख्रिश्चन, जैन, पारशी, शिख आदी धर्मातील जे कोणी लोक भारताच्या आश्रयाला आलेले आहेत त्यांना आधार देणे आणि जे कोणी घुसखोर आहेत त्यांना पिटाळून लावणे हेच या नव्या दुरूस्ती विधेयकातील प्रमुख लक्ष आहे. पाकिस्तान, बंगलादेश आणि अफगाणीस्थान हे तिन्ही देश प्रामुख्याने मुस्लिमप्रधान देश असल्याने या देशातून भारतात घुसखोरी करणाऱयांना आपल्या देशात सामावून घेण्याची गरजच नाही. भारत धर्मनिरपेक्ष देश जरूर आहे, पण ही धर्मशाळा नव्हे. हे समजून घेण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
1947 साली जेव्हा हिंदूस्थानला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा धर्मावर आधारित भारत आणि पाकिस्थान असे स्वतंत्र देश निर्माण व्हावेत असा ठराव झाला होता. त्यानुसारच फाळणी होऊन मुस्लिमप्रधान पाकिस्थान तयार झाला होता. त्यामुळेच अर्थातच भारत हा देश हिंदूप्रधान देश असणे गरजेचे होते. आपल्या देशाने मात्र मानवतेच्या दृष्टीकोनातून धर्मनिरपेक्षता स्वीकारली. ज्या मुस्लिमांना पाकिस्थानात जायचे होते ते गेले मात्र जे गेले नाहीत त्यांना भारताने सामावून घेतले. याच्या उलट पाकिस्थानात असलेल्या 23 टक्के हिंदूंवर मुस्लिम होण्यासाठी प्रचंड अत्याचार करण्यात आले. जे यासाठी तयार होणार नाहीत त्यांचे मुंडके उडवा व त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार करा असे फर्मानच म्हणे मौलवींकडून काढण्यात आले होते. एका आंतरराष्ट्रीय पत्रकाराने लिहिलेल्या ब्लड टेलिग्राम या 700 पानांच्या पुस्तकातून हिंदूंवर झालेल्या या अतोनात अत्याचारांचे वर्णन केले आहे, असेही ते म्हणाले.
विधेयकाला विरोध करून देशात धार्मिक दंगली पेटविण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली असल्याचा थेट आरोपही सोलापूरकर यांनी आपल्या व्याख्यानात केला. ते म्हणाले, भाजपने 2014 च्या निवडणुकीवेळी आपल्या जाहीरनाम्यात, नागरिकत्व दुरूस्ती विधेयक, जीएसटी अंमलबजावणी, तीन तलाख, अयोध्येतील राम मंदिर, काश्मिरचा कलम 370 प्रश्न असे अनेक मुद्दे सोडविण्याचे वचन आपल्या जाहिरनाम्यातून दिले होते. याच जाहीरनाम्याच्या आधारे भाजपने देशात स्वबळावर सत्ता हस्तगत केली. याचाच अर्थ जनतेची हीच मागणी होती असा होता. त्यानंतर झालेली निवडणूकही भाजपने याच मुद्दय़ावर प्रचंड बहुमताने जिंकली. त्यामुळे आता हे कायदे संमत झाल्यानंतर विरोधकांनी आगपाखड करण्यात काहीच अर्थ नाही. त्यांना विरोध करायचाच होता किंवा भाजपने घेतलेले हे सर्व निर्णय धर्मनिरपेक्षतेला धरून नाहीत असे विरोधकांना वाटत होते तर त्यांनी भाजपच्या जाहीरनाम्यालाच का आक्षेप घेतला नाही, असा सवाल सोलापूरकर यांनी उपस्थित केला.
आपले मुद्दे पटवून सांगण्यासाठी रामायण महाभारतील दृष्टांत, अकबर बिरबल्याच्या गोष्टींचाही चांगला वापर केला. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना नेमकी काय आहे हे अत्यंत सोप्या पद्धतीत समजावून सांगितले. धर्मनिरपेक्षता म्हणजेच प्रत्येकाने आपला धर्म आपल्या दाराच्या आत पाळावा बाहेर नाही, असेही ते म्हणाले. आंबेडकरांनी संस्कृत ही सर्व भाषांची जननी असल्याने त्याला राजभाषेचा दर्जा मिळावा या केलेल्या सूचनेलाही त्यांनी जोरदार समर्थन दिले. आपल्या देशात 1947 साली 85 टक्के लोकसंख्या हिंदूधर्मिय होती. त्यामुळे हा हिंदू विचारसरणीचा देश असे म्हटल्यास काही वावगे नाही. आता हे प्रमाण 76 टक्क्यांपर्यंत खाली असल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे. जगाच्या तुलनेत 50 वर्षे मागे असलेला आपला देश आज जागतिक पातळीवर महासत्ताक म्हणून पुढे येत आहे. आणि याचे सर्व श्रेय केवळ भाजपला जाईल याच भीतीने विरोधकांनी पुन्हा एकदा घाणेरडय़ा राजकारणाचा आधार घेत देशात धार्मिक व जातीय दंगली पेटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. देशवासियांनी आता डोळे उघडावेत, खडबडून जागे व्हावे व विरोधकांच्या या षडयंत्राला हाणून पाडावे, असे आवाहनही शेवटी त्यांनी आपल्या व्याख्यानातून केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्याप्रबोधिनी विद्यालयाच्या माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण वंदेमातरम् अत्यंत सुश्राव्य आवाजात सादर करून राष्ट्रप्रेम जागृत केले. उपस्थित श्रोत्यांनीही यावेळी स्वयंप्रेरणेने उभे राहून राष्ट्रगीताचा आदर केला. कार्यक्रमाचे शैलीदार सूत्रसंचालन भक्ती परांजपे या विद्यार्थिनीने करून श्रोत्यांची मने जिंकली. खुशी महाले या छोटय़ा विद्यार्थिनीने सादर केलेल्या पयायदानाने या व्याख्यानाची सांगता झाली.