हर्पिस जोस्टर म्हणजे नागीण. शरीराची प्रतिकारक्षमता खूपच कमी झाली असल्यास अशा वेळेला हर्पिस जोस्टर किंवा नागिण होण्याचा धोका वाढतो. कर्करोगाचे उपचार जसे रेडिएशन किंवा किमोथेरेपी घेणार्या रूग्णांची अंतर्गत क्षमता खूप कमी होते. ज्या व्यक्तींना दीर्घकाळ स्टिरॉईडसारख्या म्हणजे प्रेडनिसोनसारख्या औषधांचे सेवन करावे लागते त्यांना नागीण किंवा हर्पिस जोस्टर होण्याचा धोका अधिक असतो.
हर्पिस जोस्टर किंवा नागीण या आजाराच्या उपचारासाठी विषाणूरोधक औषध ऍसिक्लोविर औषध रूग्णाला दिले जाते, जेणेकरून शरीरातील विषाणू नष्ट होईल. हर्पिस जोस्टर च्या उपचारासाठी मुख्यत्वे हेच औषध वापरले जाते.
याव्यतिरिक्त फॅमिसायक्लोविर आणि वैलासायक्लोविर औषधेही रूग्णांना दिली जाऊ शकतात. या औषधांसमवेत रूग्णाला इतरही उपचार दिले जातात. त्या अंतर्गत पुरळावर लावण्यासाठी औषध किंवा मलम आदींचा वापर केला जातो. हा आजार पूर्णपणे बरा होण्यासाठी दोन तीन आठवडे किंवा 10 ते 20 दिवस लागतात.
या आजारात रूग्णाला खूप तीव्र वेदना होतात तेव्हा या परिस्थितीला तोंड देण्यासाठी वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी झोस्टावॅक्स औषध दिले जाते. अमेरिकेत 55 वर्षाच्या वयानंतर प्रत्येक व्यक्तीला ही लस दिली जाते जेणेकरून या आजारापासून बचाव होईल. लस घेतल्यास हा आजार होण्याची शक्यता कमी होते.
या आजाराकडे दुर्लक्ष झाल्यास रूग्णाला हर्पेटिक न्युराल्जियासारख्या गंभीर आजाराला तोंड द्यावे लागते. रूग्णाला नसांमध्ये वेदना होण्याचा त्रास होऊ शकतो. याला पोस्ट हर्पेटिक न्युराल्जिया असे म्हटले जाते. त्यामुळेच हर्पिस जोस्टर आजाराची लक्षणे दिसल्यास त्यावर त्वरेने उपचार करावेत अन्यथा रूग्णाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. या आजारावर स्वतःच काहीही उपचार करू नयेत. लक्षणे दिसताच डॉक्टरना दाखवावे.
– डॉ. सुनिल जाधव