कोटय़वधी रुपयांची उलाढाल ठप्प : यंदा आंब्याची चव चाखणे होणार दुर्मिळ : भाजीपाला सौद्यालाही मनाई
प्रतिनिधी / निपाणी
निपाणी शहरात गेल्या तीन आठवडय़ापासून लॉकडाऊनमुळे शांतता पसरली आहे. याचा परिणाम म्हणून येथील आंबा मार्केट परिसरातील भाजीपाला व फळांच्या माध्यमातून होणारे सौदे ठप्प झाले आहेत. परिणामी उत्पादक व व्यापाऱयांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान आतापर्यंत झाले आहे. तसेच यंदा शहरवासीयांना आंब्याची चव चाखणेही दुर्मिळ होते की काय? अशी स्थिती दिसून येत आहे.
निपाणी हे सीमावर्ती प्रमुख शहर असल्याने येथील व्यापाऱयांचा दररोज कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यांशी संपर्क येत असतो. मात्र येथील आंबा मार्केट परिसरात लॉकडाऊनमुळे सर्वच सौदे ठप्प झाले आहेत. वास्तविक शासनाने अत्यावश्यक सेवेअंतर्गत भाजीपाला तसेच फळांच्या सौद्याला परवानगी दिली आहे. त्यानुसार सुरुवातीला सौदे सुरु होते. मात्र यावेळी अनेक शेतकरी, व्यापारी, ग्राहक यांच्याकडून लॉकडाऊनचे उल्लंघन होऊन मोठी गर्दी होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलीस व पालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेऊन सर्वच सौदे बंद पाडले आहेत. त्यामुळे आंबा मार्केट परिसर सुनासुना वाटत आहे.
दरवर्षी मार्चअखेरीस निपाणीत रत्नागिरी, देवगड, वेंगुर्ला, हुबळी या भागातून आंबे विक्रीसाठी दाखल होतात. मात्र यंदा कडक नियमावलीमुळे आंबा आलेला नाही. दरवर्षी येथे सुमारे 300 हून अधिक टन आंब्याची उलाढाल होते. यंदा मात्र ही उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली आहे. याशिवाय सांगली, सोलापूर, पंढरपूर या भागातून येणारी द्राक्षेही अद्याप आलेली नाहीत. परिसरातून कलिंगडची आवकही निपाणीत ठप्प झाली आहे. याचा मोठा फटका व्यापाऱयांना बसला आहे. अद्याप लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता असल्याने नुकसानीचा आकडाही वाढत जाणार आहे.
तसेच आंबा मार्केटमध्ये भाजीपाला सौद्यालाही मनाई करण्यात आली आहे. याऐवजी थेट घरोघरी भाजीपाला विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकूणच दररोज लाखो रुपयांची उलाढाल होणाऱया आंबा मार्केटमध्ये सध्या शुकशुकाट पहायला मिळत आहे. लॉकडाऊन कालावधी संपवून व्यवहार सुरळीत झाल्यानंतर आंबा मार्केट परिसरातील उलाढाल पूर्ववत होणार असल्याचे व्यापारी सलिम बागवान यांनी सांगितले.