प्रतिनिधी/ निपाणी
निपाणी शहर व उपनगरात चोऱयांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांतून भीती तसेच तीव्र संतापही व्यक्त होत आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी बसस्थानकानजीक मानवी गॅरेज आवारातील दोन वाहने फोडण्यात आली. तर चिकोडी रोडवरील एका दुकानात चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. त्यामुळे निपाणी पोलिसांचा कोणताच धाक चोरटय़ांवर राहिलेला नाही हे स्पष्ट झाले आहे.
याबाबत अधिक माहिती की, निपाणीतील केळी व्यापारी वासिम बागवान यांचे येथील बसस्थानकानजीक मानवी गॅरेज आवारात केळी विक्रीचे दुकान आहे. येथे गुरुवारी रात्री त्यांनी आपला ट्रक क्र. (केए 23 बी 2291) हा गॅरेज आवारात लावला होता. मात्र गुरुवारी रात्री 11.30 च्या सुमारास चोरटय़ांनी ट्रकमधील जॅक, टॉमी, टेप व अन्य साहित्य लंपास केले. याच आवारात नितीन नारायण तोडकर या आईस्क्रीम विक्रेत्याची गाडी फोडून येथेही चोरीचा प्रयत्न केला. मात्र चोरटय़ांच्या हाती काही लागले नाही.
तसेच येथील चिकोडी रोडवरील आणखी एका दुकानात चोरटय़ांनी चोरीचा केलेला प्रयत्न फोल ठरला. असे असले तरी गेल्या एक-दीड महिन्यात निपाणी शहर व उपनगरात वाढलेल्या चोऱयांनी डोकेदुखी वाढलीच आहे. यात चोरटय़ांचा शोध घेण्यात तसेच चोरीची प्रकरणे रोखण्यात पोलिसांना अद्यापही यश न आल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. पोलिसांची गस्त ही नावालाच असल्याची चर्चा शहरवासीयांतून होत असून, एकाही घटनेचा तपास लावण्यास पोलिसांना अपयश येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.