भारत आाणि चीन यांच्यातील सीमावादाने सध्या पुन्हा डोके वर काढले आहे. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या चार भारतीय राज्यांच्या सीमा चीनला लागून आहेत. या सर्व सीमाप्रदेशाच्या काही भागांमध्ये चीन जाणून बुजून कुरापती काढतो. या दोन देशांमधील सीमा आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून ओळखली न जाता ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषा’ म्हणून ओळखली जाते. याचाच अर्थ असा की सीमाप्रदेशात ज्या रेषेवर ज्या देशाचे सैनिक उभे आहेत तिथपर्यंत त्या देशाची सीमा आहे असे मानले जाते. यावरून दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये संघर्ष उद्भवतो. तसेच कित्येकदा दोन्ही देशांचे सैनिक युद्धाच्या पवित्र्यात एकमेकांसमोर उभे ठाकतात. त्यांच्यात मारामारी होते. एकमेकांना ढकलणे, पाडविणे किंवा घाबरविण्याचा प्रयत्न करणे असेही प्रकार घडतात. सैनिक म्हटले की तो रायफल किंवा तत्सम शस्त्राचा उपयोग करूनच लढणार, अशी अनेकांची समजूत असते व ती सर्वसामान्य परिस्थितीत खरीही असते. पण भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये एकमेकांवर शस्त्र नव्हे, तर शारीरिक बळाचा उपयोग करून कुरघोडी करण्याचे प्रकार घडतात. याशिवाय चीनकडून भारतीय प्रदेशात घुसखोरी होण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. अरुणाचल प्रदेशाच्या तावांग भागात तर आठ वर्षांपूर्वी चिनी सेनेच्या काही तुकडय़ा महिनाभर तळ ठोकून होत्या. नंतर त्या माघारी गेल्या. 2017 मध्ये डोकलाम या भारत आणि भूतानला जोडणाऱया प्रदेशात चीनने घुसखोरी करून भारत व भूतान यांना एकमेकांपासून तोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भारतीय सेनेने असामान्य संयम आणि निर्धार दाखवत परिस्थिती हाताळली होती आणि तब्बल 73 दिवसांच्या या खडाखडीनंतर चिनी सैन्य माघारी गेले होते. या संघर्षाचे वैशिष्टय़ म्हणजे 1967 नंतर असे संघर्ष अनेकदा झाले पण दोन्ही सैन्यांमध्ये एकदाही एकही गोळी झाडली गेलेली नाही. म्हणजेच हे युदद्ध नसून दबावतंत्र असते. असे प्रकार चिनी सेनेकडून अधिक प्रमाणात घडतात व भारत सर्वसाधारणपणे प्रतिकार करण्याचे धोरण आचरणात आणतो. सध्या जो संघर्ष सुरू आहे, त्याचेही स्वरूप असेच आहे पण त्याला कोरोना उद्रेकाची पार्श्वभूमी आहे. कोरोनाचा विषाणू चीनमधूनच जगात सर्वत्र पसरला. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आदी आर्थिक आणि सामरिक महासत्तांचेही प्रचंड नुकसान या उद्रेकाने होत आहे. त्यामुळे भारतासह पाश्चात्य जगात चीनविरोधात असंतोष खदखदत आहे. चीनवर दोन प्रकारचे आरोप केले जातात. एक, या विषाणूच्या उद्रेकाची माहिती चीनने जगापासून हेतुपुरस्सर लपवून ठेवली. त्यामुळे जग बेसावध राहिले आणि नंतर कोरोनाच्या उद्रेकाला मोठय़ा प्रमाणात बळी पडले. दुसऱया आरोपानुसार हा विषाणू चीननेच तयार केला असून स्वतःचे वर्चस्व जगावर स्थापन करण्यासाठी या विषाणूचा प्रसारही त्यानेच केला. यापैकी कोणताही आरोप खरा असला किंवा दोन्ही खरे असले तरी सध्याची परिस्थिती अशी आहे की, चीनकडे सारे जग संशयाच्या दृष्टीने पहात असून त्या देशाला धडा शिकवायलाच हवा, अशी तीव्र सार्वत्रिक भावना आहे. युरोपियन महासंघाच्या काही देशांनी या कोरोना प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. चीनने अर्थातच या मागणीला कडाडून विरोध केला. पण भारताने चौकशीच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. यामुळे चीन बिथरला असून त्याने भारताची कुरापत काढण्यास आरंभ केला आहे. प्रारंभी त्याने नेपाळला भारताविरोधात चिथावणी दिली. त्यामुळे लडाखमधील जो भाग निर्विवादपणे भारताच्या अधिकारात आहे, तो आपल्या नकाशात दाखवून नेपाळने भारताची कळ काढली. हे त्या देशाने चीनच्या सांगण्यावरूनच केले हे निश्चित आहे. पण तेवढय़ानेही भागत नाही, म्हणून आता स्वतःच त्याने भारतावर दबाव आणण्यास प्रारंभ केला आहे. म्हणूनच कोरोना संकटाच्या काळातच हे प्रकार घडत आहेत. पण गेल्या चार पाच वर्षांपासून भारताच्या भूमिकेत मात्र मोठे गुणात्मक परिवर्तन झाल्याचे दिसून येते. केव्हा ना केव्हा आपल्याला चीनशी संघर्ष करावा लागणार, हे ओळखून भारताने सीमेवर सज्जता वाढविण्यास प्रारंभ केला. सीमेपर्यंत मार्ग बांधून सैनिक वाहने शेवटच्या टोकापर्यंत जातील अशी व्यवस्था केली जात आहे. तसेच अरुणाचल प्रदेशात विमानांसाठी धावपट्टय़ा बांधून वायुदलाची सोय पाहिली आहे. कोणत्याही स्वतंत्र देशाला आपल्या सीमांचे रक्षण सर्वात आधी करावे लागते, हे साधे तत्त्व आहे. पण मागच्या सरकारांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. आपले सामरिक धोरण नेहमीच पाकिस्तानकेंदी राहिले होते. भविष्यात चीनच्या आव्हानाचाही स्वीकार करावा लागेल या वस्तुस्थितीपासून पळ काढण्यात आपल्या मागच्या सरकारांनी धन्यता मानलेली होती. त्यामुळे सीमेवर सेनेच्या सोयीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याकडे अक्षम्य आणि हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले. चीनकडून आपल्याला धोका नाही, अशा (चुकीच्या) समजुतीच्या आधारावरच आपली धोरण आखणी होत होती. पण मोदी सरकारने हा धोका ओळखून त्याला तोंड देण्याच्या दृष्टीने सज्जता चालविली आहे. त्यामुळे चीनच्या संतापात भर पडली असून त्याचा अहंकार दुखावला गेला आहे. त्यामुळे भारताला त्याची ‘जागा’ दाखवून देण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. पण भारताने कौतुकास्पद निर्धार आणि संयम यांचे एकचवेळी प्रत्यंतर देत चीनचे दबावतंत्र हाताळल्याचे दिसते. म्हणून लडाखमधल्या ताज्या 21 दिवसांच्या खडाखडीनंतर चीनने शांतता, सौहार्द आणि दृढ द्विपक्षीय संबंध इत्यादी भाषा सुरू केली आहे. चीनच्या सकृतदर्शनी नरमाईचे दुसरे कारण असे आहे की सध्या चीनलाही युद्ध परवडण्यासारखे नाही. कारण कोरोना प्रकरणात त्याची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. अशा स्थितीत त्याने युद्ध सुरू केल्यास जगातील सर्व देश (पाक किंवा तत्सम राष्ट्रांचा अपवाद वगळता) त्याच्या विरोधात एकत्र येऊ शकतात. तसे निमित्त जगाला मिळवून देणे सध्या चीनच्या फायद्याचे नाही. मात्र काहीही असले तरी भारताने सीमेवर अखंड सावधानता बाळगत चीनचा दबाव झुगारण्याचे सध्याचेच धोरण सातत्याने सुरू ठेवणे आवश्यक आहे, त्यातच भारताचे हित आहे.
Previous Articleएंशी वर्षे पार केलेल्या निवृत्त कर्मचाऱयांना वाढीव वेतन
Next Article घरपट्टी वसूलीसाठी मनपाने लपविला आदेश
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment