जगभर जे सुरू आहे ते सारे धक्कादायक आहे. कोरोनाचा व्हायरस अवघ्या विश्वात धुमाकूळ घालत आहे. जगभराची रूग्णसंख्या 17 ते 18 लाखांच्या घरात पोहोचली आहे आणि मृतांची संख्या लाखाच्या पलीकडे गेली आहे. अमेरिका, इटली, स्पेन, जर्मनी, चीन, फ्रान्स, इराण, इंग्लंड येथील कोरोनाचे थैमान भयभीत करणारे आहे. भारतातही रूग्णांची संख्या 8,000 वर गेली आहे आणि बळींची संख्या 300 झाली आहे. आपणास सर्वात काळजी म्हणजे देशात, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात मुंबई पुणे यांची कोरोना रूग्णांची संख्या आणि बळींची संख्या व प्रमाण थरकाप उडवणारे आहे. जगात कोरोना रूग्णातील मृत्युचे जे प्रमाण आहे. त्यांच्या दुप्पट किंवा त्याहून अधिक मृत्यू प्रमाण महाराष्ट्रात आहे आणि ती सर्वाधिक चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी लॉकडाऊनची मुदत एप्रिल अखेरपर्यंत वाढवली आहे आणि आज उद्या संपूर्ण देशाची लॉकडाऊनची मुदत पंतप्रधान नरेंद मोदी वाढवणार हे सुस्पष्ट आहे. लॉकडाऊनची व्यवस्थित अंमलबजावणी झाली, तर हॉटस्पॉट कोरोनामुक्त होतो हे सांगली जिल्हय़ातील इस्लामपूरने दाखवून दिले आहे. 26 रूग्ण असलेले हे गाव कोरोनामुक्त झाले. इस्लामपूर पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे. एकही बळी न जाता 26 पॉझिटिव्ह रूग्ण पूर्ण निगेटिव्ह झाले असे उदाहरण इस्लामपूरने घालून दिले आहे आणि तोच कित्ता महाराष्ट्राने, देशाने गिरवायला हवा. लॉकडाऊनमुळे आणि कोरोनामुळे प्रचंड उलथापालथ झाली आहे. ‘शिर सलामत तो पगडी पचास’ म्हणायला आणि धोरण म्हणूनही योग्य असले तरी जीव वाचवताना अर्थव्यवस्थेचा जो बळी जात आहे त्यामुळे सर्वांचीच घालमेल होत आहे. महिना अखेरपर्यंत कोरोनाचे हे तांडव थांबेल असे वाटत नाही. पुढे पावसाळा आहे. थंडी खोकल्याचे आणि पावसाचे घट्ट नाते आहे. एकूणच आरोग्यापासून अर्थव्यवस्थेपर्यंत आणि जीवनापासून जीवनशैलीपर्यंत अनेक गोष्टींना नख लागले आहे. शेती, उद्योग, व्यवसाय, व्यापार, करमणूक, विकास, सुधारणा, शिक्षण यासह सर्व क्षेत्राला हानी पोहोचली आहे. आज सर्वदूर जी चर्चा आणि मानसिक अवस्था दिसते आहे ती पाहता माणसांना निसर्गाशी नवा करारच करायला लागणार आहे. करार नवा असला तरी त्याचा तपशील जुना आणि आपल्या संस्कृतीने सांगितलेला आहे. महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानात, गांधी विचारात या कराराचे सत्व सामावलेले आहे. ग्रामराज्य, रामराज्य हे त्याचे मूळ आहे. आणि निसर्ग रक्षण, निसर्गोपचार याच जोडीला सत्य, अहिंसा, मानवता, सदाचार यांची महती अधोरेखित आहे. जगा आणि जगू द्या हा जुना विचार पुन्हा नव्याने करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. अनेक दिवस घरात कोंडून पडलेली माणसे आज जग 25 वर्षे मागे गेले आणि जुनी नीतीमूल्ये, प्राचीन संस्कृती आणि जीवनपद्धतीचे महत्त्व स्पष्ट झाले असे म्हणताना दिसत आहेत. आज ना उद्या लॉकडाऊन संपेल. कोरोनावर जालीम इलाज निघेल. पण विषाणूची भीती संपणारी नाही. लॉकडाऊन नंतरचे जग कसे असेल याचे चित्र अनेकजण रंगवत आहेत. त्यामध्ये भारतासह अनेक देशाची अर्थव्यवस्था घायाळ झाली असेल विकासकामे, महसूल उत्पन्न ठप्प होईल, नोकर पगारासाठीही सरकारला कर्ज काढावे लागेल. कायदे बदलतील, बेरोजगारी वाढेल, उद्योगधंदे बंद पडतील, मनोरूग्ण वाढतील, विमान प्रवास, पर्यटन, हॉटेलिंग, चैनीच्या वस्तु, फॅशन, करमणूक यांना मोठा फटका बसेल. आर्थिक संस्थांना संकटांना सामोरे जावे लागेल. मोठे पगार घेणाऱया नोकरदारांना नोकऱया गमवाव्या लागतील, वेतन आयोग वगैरेचा फेरविचार होईल, गुंतवणूक अडचणीत येईल. वगैरे वगैरे संभाव्य चित्र वेगवेगळे लोक मांडत आहेत. त्याच जोडीला विदेशात आणि महानगरात गेलेले लोंढे पुन्हा गावाकडे वळतील. ते गावात आल्याने जमीन आणि घर वाटपांचे तंटे उद्भवतील. शेतीवरचा बोजा वाढेल. उत्तम नोकरी हे सूत्र मागे पडेल असे अनेक तर्क केले जात आहेत. त्याच जोडीला भारताने बऱयापैकी कोरोनावर विजय मिळवला तर भारतात गुंतवणूक वाढेल आणि नोकरी व्यवसायाच्या संधी वाढतील अशीही शक्यता आहे. माणसांची जगण्याची, विचारांची पद्धत बदलणार हे वेगळे सांगायला नको. कोरोनाच्या या काळात लोकांना देवळे बंद ठेवायला लागली आणि धर्म गुंडाळून ठेवण्याची वेळ आली सर्वात मोठी मानवता आणि सेवाधर्म यांची प्रचिती आली. डॉक्टर, परिचारिका, पोलीस, पत्रकार, प्रशासन यांचे महत्त्व सर्वाच्याच लक्षात आले.अजूनही काही मंडळींना कोरोनाचे संकट लक्षात आलेले नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागते. पोलिसांवर हल्ले होत आहेत, लॉकडाऊनचे उल्लंघन केले जात आहे सत्तेचा माज काही ठिकाणी डोकावतो आहे. धार्मिक परंपरा कवटाळून मंडळी कोरोनाला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. हे काटेकोरपणे थांबले पाहिजे. या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वांनी घरात कोंडून घेऊन सरकारी सूचनांचे पालन केले पाहिजे. लॉकडाऊनमुळे निसर्ग नवे रूप घेताना रिचार्ज होताना दिसतो आहे. चैत्र मासाचा आणि वसंतऋतुचाही हा महिमा आहे. प्रचंड लोकसंख्या, वाहनसंख्या, प्रदूषण आणि निसर्गावर आक्रमण यामुळे निसर्गातली ही नवलाई लुप्त झाली होती पण स्वच्छ आकाश दिसते आहे, नद्या, पाणीसाठे स्वच्छ झाले आहेत. कासवांची संख्या वाढली आहे. हरणे,ससे, मोर नाचताना दिसत आहेत. निसर्ग रिचार्ज होतो आहे. कोरोना हटेल, संकट संपेल, पण निसर्गाने दिलेला हा धडा आणि दाखवलेली नवलाई विसरता येणार नाही. मानव समूहाला निसर्ग रक्षणाचे आणि जीवनशैलीचा नवा करार करावा लागेल. अवघ्या विश्वाने, अवघ्या मानवजातीने निसर्गापुढे आपण क्षुल्लक आहोत आणि आपल्या अस्तित्वासाठी निसर्ग रक्षण हाच अग्रक्रम आहे हे ठरवले पाहिजे. व्यसनापासून अनुचित व्यापारापर्यंत आणि ग्लोबलायझेशनपासून ग्रामराज्यापर्यंत अनेक गोष्टीत सुधारणा कराव्या लागतील. तोच मानवतेचा करार असेल तो लिहिला जाणार नाही. आचरणात आणावा लागेल. तुर्त घरात कोंडून घेणे आणि कोरोनाला पराभूत करणे महत्त्वाचे.
Previous Articleदोस्त माझा मस्त
Next Article सातारा : मोराच्या शिकारीप्रकरणी दोघांना अटक
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment