ऑनलाईन टीम / लंडन :
पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार 570 कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पण करण्याला ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.
नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याबाबत लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने 25 फेब्रुवारी रोजी निर्णय दिला होता. या निर्णयानंतर नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार आता ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्यास मंजुरी दिली आहे.
आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात नीरव मोदीने पुरावे नष्ट करणे तसेच साक्षीदारांना भीती घालण्याचा कट रचला होता. त्यामुळे त्याला भारतातील न्यायालयात याचे उत्तर द्यावे लागेल. नीरव मोदीला मुंबईमधील ऑर्थर रोड जेलमध्ये योग्य ते औषधोपचार आणि मानसिक आरोग्यासाठी सुविधा पुरवल्या जातील.