गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावात पोलीस आयुक्त कार्यालय इमारत उभारणीसाठी 17 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. अत्याधुनिक पोलीस आयुक्त कार्यालय उभारण्यात येत असून मंगळवारी लिंगराज कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या सिटी पोलीसलाईन परिसरात गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते कोनशिला समारंभ पार पडला.
बेळगाव येथे पोलीस आयुक्त कार्यालय सुरू होऊन सात वर्षे उलटली तरी अद्याप आयुक्तांसाठी स्वतंत्र कार्यालय नव्हते. जुन्या पोलीस मुख्यालयात त्यांचे कार्यालय सुरू होते. आता नव्या इमारतीचा कोनशिला कार्यक्रम झाला असून 2 एकर 20 गुंठय़ांमध्ये ही इमारत उभारण्यात येणार आहे. सर्व सुविधा असलेली सुसज्ज इमारत वेळेत उभारली जाईल, असेही बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, एडीजीपी अलोककुमार, बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक एच. जी. राघवेंद्र सुहास, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, माजी आमदार संजय पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.