मध्यप्रदेशातील कार्यक्रमात आत्मनिर्भरतेचा संदेश
भोपाळ / वृत्तसंस्था
भारता झपाटय़ाने विदेशांवरील आपले अवलंबित्व कमी करत आहे. आत्मनिर्भरतेच्या मार्गावर आपल्याला वेगाने प्रवास करायचा असून वंदे भारत एक्स्प्रेस हे याच आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांच्या हस्ते शनिवारी मध्यप्रदेशातील प्रथम आणि भारतातील 11 व्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस गाडीचा शुभारंभ करण्यात आला. त्या कार्यक्रमात ते भाषण करीत होते. ही गाडी मध्यप्रदेशातील राणी कमलापती स्थानक ते दिल्लीतील हजरत निजामुद्दिन स्थानकापर्यंत जाणार असून तिवा वेग 160 किमी प्रतितास इतका आहे. वंदे भारतच्या इंजिनांची निर्मिती पूर्णपणे भारतीय आहे.
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी इंदूर येथे रामनवमीला झालेल्या दुर्घटनेसंबंधी दुःख व्यक्त केले. तसेच त्यांनी सध्याच्या राजकारणावरही मतप्रदर्शन केले. ही गाडी गुलामीच्या मानसिकतेतून भारताला मुक्त करेल. आपल्याला काही कामे जमणारच नाहीत. त्यासाठी आपल्याला विदेशांवरच अवलंबून रहावे लागेल, अशी मानसिकता पूर्वीच्या सरकारांच्या काळात होती. पण आता या स्थितीत परिवर्तन होत आहे. आपण प्रयत्न केले तर मोठी आव्हानेही पेलू शकतो, असा आत्मविश्वास भारतीयांच्या मनात निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
परिवारवादावर टीका
अनेक दशके हा देश एकाच परिवाराभोवतील फिरत राहिला. तो परिवार म्हणजेच देश अशी समजूत करुन देण्यात आली. इतर कोटय़वधी मध्यमर्गिय आणि गरीब परिवारांना त्यांच्या त्यांच्या जबाबदारीवर सोडण्यात आले. त्यांच्या आशा-आकांक्षा आणि स्वप्नांना कोणीही वाली नव्हता. पण आज तशी स्थिती नाही. आज सर्वसामान्यांमधींल सर्वसामान्यही उच्चपदस्थ होऊ शकतो. ही प्रगती स्पृहणीय असून हे भारतीयांचे यश आहे, अशीही मांडणी त्यांनी केली.