गुरुवारच्या पहाटे कोल्हापूर जिह्यातील अकराव्या शतकापासूनचा इतिहास असणाऱ्या किल्ले पन्हाळगडावर असलेल्या तानपीर नावाच्या एका जुन्या मजारीची अज्ञात समाजकंटकांनी नासधूस केली. हा प्रकार गुरुवारच्या पूजेसाठी आलेल्या पुजाऱ्याच्या ध्यानात आल्यानंतर त्याने पोलिसांना, गावकऱ्यांना याची माहिती दिली. पन्हाळ्याच्या गावकऱ्यांनी पुढच्या दोन तासात ही मजार होती तशी पूर्ववत करून दिली. पोलिसांनी ही घटना घडण्यापूर्वी आठ दिवसांपासून सोशल मीडियावर फिरणाऱ्या मजार विरोधी संदेशावरुन दोन समाजकंटकांना अटक केली आहे. पोलिसांनी त्याचे नाव जाहीर केले नसले तरीसुद्धा काही मंडळींनी एका राजकीय पक्षाच्या जयसिंगपूर येथील कार्यकर्त्याचे व हॉटेल चालकाचे नाव घालून ‘आपल्या सत्ताकाळात सुद्धा’ कार्यकर्त्यावर असे गुन्हे दाखल होत असतील तर काय उपयोग? असा संदेश पसरवल्याने वेगळीच चर्चा घडू लागली आहे. हा व्यक्ती कोण? कोणत्या पक्षाचा? तो खरोखर आरोपी आहे की पोलिसांनी तपास सोडून सोपे सावज टार्गेट करुन खरे आरोपी पकडलेच नाहीत? हा इथल्या चर्चेचा विषय नाही. विषय आहे तो पन्हाळ्याच्या घटनेने जो गंभीर इशारा दिला आहे त्याचा. पन्हाळा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या निर्ढावलेपणाचा आणि ग्रामस्थांनी सामंजस्यातून देशभर दिलेल्या सकारात्मक संदेशाचा! त्या बरोबरीनेच ऐतिहासिक गडकोट आणि वास्तूंवर चालणारा अधिकार नगरपालिका, केंद्रीय पुरातत्त्व विभाग, वनविभाग आणि पोलीस यांच्यामध्ये विभागून ठेवल्याने निर्माण झालेल्या गोंधळाचा! 11 व्या शतकात शिलाहार शासक राजा भोज दुसरा याने हा किल्ला बांधला. मात्र काळ बदलला तसा हा किल्ला विविध शासकांच्या ताब्यात गेला. कधी शिवाजी महाराज, कधी आदिलशहा, कधी मोगल आणि ताराराणीच्या काळात तर हा किल्ला स्वराज्याची राजधानी म्हणून लोकवस्तीचाही बनला. प्रत्येक राज्यकर्त्याच्या उपस्थितीच्या खुणा या किल्ल्यावर आहेत. अगदी इंग्रजांनी केलेले बदलसुद्धा जाणवतात. त्यामुळे या गावठाणात मिश्र लोकवस्ती असणे, त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक खुणा विस्तीर्ण किल्ल्यावर खुलेपणाने दिसणे यात नवल नाही. त्यामुळे इथली बांधकामे कुठल्या काळापासूनची आहेत त्याची नोंद पुरातत्त्व खाते, नगरपालिका, महसूल उपविभाग, वनविभाग आणि पोलीस ठाण्याकडे असलीच पाहिजे. सर्व बाबींचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरकार म्हणून या सर्व यंत्रणांवरच येऊन पडते. मात्र वास्तवात पुरातत्त्व खात्याचा अधिकारी वर्षा दोन वर्षातून चार दिवस पर्यटनाला इथे येतो, वन विभाग आपल्या पुरते बघतो. मजार त्यांच्या हद्दीत असताना तपासात ते दिसतच नाहीत. नगरपालिका आपल्या दिवा-बत्ती आणि ऐक्याच्या फुशारकीपुरती. त्यांना वर्षानुवर्षे शिवरायांचा पुतळा उभारणे झाले नाही ते कदाचित मद्य विक्रेत्यांच्या काळजीपोटी! सर्वात गंभीर निष्काळजीपणा झाला तो पन्हाळा पोलीस ठाण्याकडून. सोशल मीडियावर या मजारी हटवण्याबाबतचा मजकूर आठ दिवस आधी पसरत असल्याचे गावकऱ्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते. तिथल्या अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले आणि बुधवारच्या रात्री किंवा गुरुवारच्या पहाटे मजारीची नासधूस करण्यात आली. याबाबत स्थानिकांचे म्हणणे असे आहे की, आमच्या गावातील लोकांचा यातील कुठल्याही बाबतीत आक्षेप नाही. वर्षानुवर्षे इथल्या मशिदीत किल्ल्यावरील तोफा सुरक्षितपणे ठेवलेल्या होत्या. सुमारे तीस वर्षांपूर्वी सुद्धा गावात असेच दोन धर्मांमध्ये वाद लावून दंगल माजवण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र त्यावेळीही दोन्ही बाजूच्या लोकांनी शांततेने प्रकरण हाताळले. बाहेरून येणारे लोक आमच्या गावातील बाबींमध्ये ढवळाढवळ करू पाहतात. घटना घडल्यानंतर पोलिसांनी लोकांसाठी किल्ल्याचा रस्ता बंद करून टाकला. जिल्हा पातळीवर मोठा बंदोबस्त मागवला आणि नंतर धावपळ सुरू केली. तेवढे करण्यापेक्षा आधीच काळजी घेतली असती तर हा प्रकार घडला नसता. चार दिवस लोकांचा रोजगार बुडाला नसता. वास्तविक पन्हाळ्याच्या ग्रामस्थांनी जो संदेश दिला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. देशातल्या कानाकोपऱ्यात कुठे मशिदीची तर कुठे मंदिराची विटंबना, पावित्र्यभंग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या त्या भागातील लोकांनी जर ही प्रकरणे सामंजस्यपूर्णरित्या हाताळली नाहीत आणि दुसऱ्या धर्माच्या व्यक्ती विरोधात दंगा घालण्याची संधी म्हणून या घटनेकडे पाहिले तर गावोगाव दंगल माजण्याची भीती आहे. अशा अनेक घटना राज्यात छोट्या छोट्या गावांपासून शहरातील गल्ली कोपऱ्यांपर्यंत घडताना दिसत आहेत. समाज माध्यमावर त्या विरोधात किंवा समर्थनात मोठ्याने आरोळी ठोकून गैरफायदा घेणारे समाजकंटक निर्माण होत आहेत. या सर्वांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी गंभीर पावले उचलण्याची गरज आहे. गावागावात पूर्वी दरोडेखोरांना रोखण्यासाठी पोलीस दलाने ग्राम सुरक्षा दले केली होती. त्यामध्ये प्रत्येक घरातील एक तरुण गस्तीला सामील करून घेतला जायचा. शहरी भागात शांतता समित्या आणि मोहल्ला समित्या स्थापन करून पोलीस अधिकारी स्वत: चौका चौकात भेटीगाठीचे कार्यक्रम करायचे. साध्या वेशातील पोलीस आणि बीट मार्शल गुड मॉर्निंग आणि गुड इवनिंग पथक स्थापन करून गल्लीबोळातील पुतळे, मंदिरे, मशिदी, दर्गे यांच्या फेऱ्या करायचे आणि वातावरण सुस्थितीत राहील याची काळजी घ्यायचे. अलीकडच्या काळात काही शहरांचा आणि गावांचा अपवाद सोडला तर पोलीस दलाला आपल्या या उपक्रमाचा विसर पडलेला दिसतो. परिणामी पोलीस समाजापासून तुटले आहेत आणि समाजात घडणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या गुन्हेगारी कारवाईची माहिती त्यांना मिळत नाही. त्याचा परिणाम अनेक गंभीर गुन्हे उघडकीस न येण्यामध्ये होत आहे. पोलीस तपास केवळ सीसीटीव्हीच्या भरवशावर सुरु आहे. पन्हाळ्यात तोही फसला. हा इशारा आणि संदेश लक्षात घेऊन पुरातत्व, पोलीस, वन, महसूल खाते जागे झाले नाहीत तर अनेक गडांवर ही डोकेदुखी ठरणार आहे.
Previous Articleअमेरिकेवरील आर्थिक संकट टळले
Next Article विरोधकांच्या बहिष्कारात सरकारने खेळला मोठा डाव!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment