सण-उत्सव,शैक्षणिक सहलींसाठी विशेष बससेवा : अतिरिक्त महसूल मिळण्याचा विश्वास
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाच्या संकटानंतर यात्रा-जत्रा, सण-उत्सव आणि पर्यटन पूर्ववतपणे सुरू झाले आहे. त्यामुळे परिवहनच्या व्यावसायिक हंगामाला प्रारंभ झाला आहे. विविध मार्गांवर अतिरिक्त बस धावत असल्याने परिवहनची आर्थिक स्थिती सुधारत आहे.
यंदा सण-उत्सव सुरळीत सुरू झाल्याने विविध मार्गांवर बससेवाही पूर्ववत झाली आहे. दसरा, गणेशोत्सव, दिवाळी आणि सौंदत्ती यल्लम्मा यात्रेतून समाधानकारक महसूल मिळाला. सौंदत्ती यात्रेतून परिवहनला 53 लाखांचा महसूल प्राप्त झाला. दसरा, गणेशोत्सव आणि दिवाळीसाठी जादा बस सोडण्यात आल्या होत्या. या बससेवेलाही प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे सण-उत्सव काळात परिवहनला अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळाले. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने परिवहनला व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. या काळात विविध मार्गांवर जादा बस सोडल्याने उत्पन्नही अधिक मिळत असते.
पावसाळय़ानंतर पर्यटन अधिक
दरवषी ऑक्टोबर, नोक्हेंबर आणि डिसेंबरमध्ये पर्यटनस्थळांना भेटी देणाऱया नागरिकांची संख्या अधिक असते. दरम्यान, या काळात जादा बस सोडल्या जातात. त्यामुळे परिवहनला अतिरिक्त महसूल प्राप्त होतो. मागील दोन वर्षात कोरोनामुळे परिवहनच्या व्यावसायिक हंगामावर परिणाम झाला होता. यंदा सर्व व्यवहार पूर्वपदावर आल्याने परिवहनच्या व्यावसायिक हंगामाला प्रारंभ झाला आहे. पावसाळा संपल्यानंतर पर्यटन करणाऱया नागरिकांची संख्या अधिक असते. त्यामुळे ऑक्टोबरनंतर परिवहनला अधिक महसूल मिळत असतो.
विशेषतः ऑक्टोबरपासून बेंगळूर, म्हैसूर, विजापूर, श्रवणबेळगोळ यासह महाबळेश्वर आणि गोव्यातील पर्यटनस्थळांना भेट देणाऱया नागरिकांची संख्या अधिक असते. त्यामुळे पर्यटकांच्या माध्यमातून परिवहनला समाधानकारक उत्पन्न प्राप्त होते.
शैक्षणिक सहली
ऑक्टोबरनंतर शैक्षणिक सहलींना सुरुवात होते. दरम्यान, सुरक्षित प्रवासाच्या दृष्टिकोनातून परिवहनच्या बसला पसंती दिली जाते. शाळांच्या सहली घेऊन परिवहनच्या बसेस विविध मार्गांवर धावत असतात. त्यामुळे शैक्षणिक सहलींतूनही परिवहनला समाधानकारक उत्पन्न मिळत असते. शाळांना सहलींसाठी सवलतीच्या दरात बस उपलब्ध केल्या जातात. त्यामुळे सहलीतून उत्पन्न प्राप्त होत असते.
अतिरिक्त बस उपलब्ध
ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हा काळ परिवहनसाठी व्यावसायिक हंगाम आहे. या काळात विविध मार्गांवर अतिरिक्त बस धावत असतात. या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळत असते. सण-उत्सवांबरोबर शैक्षणिक सहलींसाठी याच काळात जादा बस धावतात.
पी. वाय. नायक (विभागीय नियंत्रण अधिकारी)