गौरी आवळे / सातारा :
शहरापेक्षा ग्रामीण भागातील महिलांना सक्षमीकरणाची गरज जास्त असते. हा विचार मोडीत काढत, गेल्या अनेक वर्षापासून पसरणी येथील महिलांना सोबत घेवून विकासाचे नवे धोरण पसरणीच्या सरपंच हेमलता अशोक गायकवाड यांनी निर्माण केले आहे. बचत गट ते सामाजिक कार्य आणि राजकारण असा प्रवास त्यांनी यशस्वीपणे सुरू ठेवला आहे.
हेमलता अशोक गायकवाड यांचे माहेर पळशी (ता. कारेगाव), सासर पसरणी आहे. लग्नानंतर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. फक्त शिक्षण पूर्ण करून त्या थांबल्या नाहीत तर अनेक कोर्स त्यांनी केले. त्यांनी नोकरी न करता समाजकार्याची वाट धरली. गावातील महिलांना रोजगार मिळावा. बचतीची सवय लागावी. सरकारच्या नव्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचावी म्हणून त्या महिलांना सक्षम करण्यासाठी धडपडत होत्या.
1990 साली त्यांनी आप्तदि महिला मंडळ स्थापन केले. 1995 साली त्या आंबेडकर नागरी पतसंस्था पुणे च्या व्हाईस चेअरमन होत्या. त्यानंतर एका कंझ्युमर सोसायटीची त्यांनी स्थापना केली. त्यामध्ये संचालक होत्या. त्या ब्रेन डेन संस्थेत काम करत होत्या. त्यावेळी बचत गटाची संकल्पना उदयास आली होती. परंतु बचत गटाची माहिती महिलांना नव्हती. यांची माहिती महिलांना मिळावी म्हणून स्वखर्चाने तालुक्यात फिरत होत्या. महिलांना एकत्र करून बचत गट ही संकल्पना काय आहे. ती कशी सुरू करायची, त्यांचे फायदे काय यांची माहिती पोहचवत होत्या. 2000 साली त्यांनी तीन बचत गट स्थापन केले. त्यावेळी स्वयंम सहायत्ता बचत गट असे नाव होते. काही दिवसांनी अनेक सामाजिक संस्था, बँका यांच्या माध्यमातून बचत गट स्थापन करण्यास आणखी बळ मिळाले. आणि पसरणी या गावात त्यांनी आठ बचत गट स्थापन केले. या बचत गटामुळे महिलांना बचतीची सवय लागली. महिला दर पाच वर्षांनी पुन्हा गट स्थापन करून शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत. तसेच कर्ज घेवून त्या कर्जाची परतफेड करत आहे. यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी त्या स्वत: सोडवत आहेत. गेले अनेक वर्षापासूनचे हे बचत गट आजही यशस्वीरित्या सुरु आहेत.
समाजकार्यासोबत त्यांनी राजकारणातही आपला ठसा उमटवलेला आहे. पती अशोक बापू गायकवाड यांच्यामुळे त्यांना राजकारणाची आवड निर्माण झाली. अशोक बापू गायकवाड हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हाध्यक्ष आहेत. पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना गावाच्या विकासाला हातभार लावायला सुरूवात केली.
2008 साली त्यांनी पसरणी ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या निवडून आल्या. त्या पसरणी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत. हे त्यांचे दुसरे वर्ष आहे. त्यामुळे पसरणी ग्रामपंचायत निवडणुकीत तीन वेळा निवडून येणाची त्यांनी हॅटट्रिक केली आहे. त्यांना राजकारणात त्याच्या मुलांकडूनही प्रोत्साहन मिळत आहे. त्यांची मुले उच्चशिक्षित आहेत. आपल्या आईच्या कार्याचा गौरव मुले नेहमी करत असतात. त्यांनी भूमी या गेंडस मुलींला दत्तक घेवून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. समाजातील असे अनेक मुले आहेत. ज्यांना आधाराची, घराची गरज आहे. त्यांचा विचार प्रत्येकांने केला पाहिजे. हीच शिकवण त्यांच्या कार्यातून शिकायला मिळत आहे. त्यांना गावात वहिनी या नावाने ओळखले जाते. आज पसरणी गावात वहिनीच्या नावाचा जसा दबदबा आहे. तसाच कामाचाही आहे.
महिलांनी सक्षम झाले पाहिजे
आम्ही शहरात राहतो की खेडय़ात हे महत्त्वाचे नाही. तर येणाऱया प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी महिलांनी सक्षम झाले पाहिजे. सक्षमीकरण हा तुमच्या अस्तिवाची खरी ओळख निर्माण करत आहे. शिक्षण घेवून नोकरी करणे आणि नोकरी करून घरची जबाबदारी सांभाळणे ही बाब महिलांनाच नाही तर पुरूषांनाही प्रेरणा देणारी ठरणार आहे. यामुळे महिलांनी सक्षम झालेच पाहिजे.
– हेमलता अशोक गायकवाड,
सरपंच, पसरणी ग्रामपंचायत