कराड तालुक्यातील पांढरीचीवाडी येथील धरे शिवारात सोमवारी (दि.31) दुपारी शंकर तुकाराम ढेरे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना बिबट्याची तीन बछडी आढळली होती. वनविभागाने या तिन्ही बछड्यांना ताब्यात घेऊन आई आणि बछड्यांची भेट घडवून आणायचे ठरवले. सोमवारी मध्यरात्रीनंतर मादी बिबट्या येऊन बछड्यांना घेऊन गेल्याची माहिती वनविभागाकडून आज सकाळी समजली.
ढेरे यांच्या शेतात सोमवारी दुपारी बिबट्याच्या बछड्यांचे दर्शन होताच शिवारातील शेतकऱ्यांनी पोलीस पाटील सतीश भिसे यांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वनाधिकारी तुषार नवले व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना कल्पना दिली. वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याची बछडी ताब्यात घेतली. मादी बिबट्या ही जवळपासच होती व ती चिडून आक्रमक होऊ नये म्हणून वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार सदर तीन बछड्यांचे आई सोबत भेट घडवून आणायचे ठरले, त्या प्रमाणे सायंकाळी ६.३० वाजता संबंधित शिवारात पुन्हा तीन बछडे एका क्रेटमध्ये ठेवून आजूबाजूला कॅमेरे लावून ठेवण्यात आले, कॅमेरा लावत असतानाच बिबट्याच्या मादीने शेजारी दर्शन दिले, ती आजूबाजूला घुटमळत होती. त्यामुळे बछडे क्रेटमध्ये ठेवून केमेरा लावून अधिकारी जागेवरून निघाले. त्यानंतर काही वेळात मादी तिन्ही बछड्यांना घेऊन निघून गेली. मादीसह बछडी शिवारात सुरक्षितरीत्या दृष्टीआड झाल्यानंतर वनाधिकारी तेथून रवाना झाले.
Previous Articleजिह्यामध्ये एसटीच्या फेऱयांमध्ये पुन्हा वाढ
Next Article सरकारी योजनांचे राष्ट्रपतींकडून कौतुक
Related Posts
Add A Comment