दोन लबाडांच्या वादविवादात एकमेकांशी तावातावाने भांडताना नकळतपणे कधी कधी लखलखीत सत्य बाहेर पडते. सत्य हे अखेर सत्यच असते. असत्याबरोबरच्या लढाईत त्याचा नेहमीच विजय होतो. असाच काहीसा प्रकार पाकिस्तान संसदेमध्ये गुरुवारी घडला. पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) पक्षाचे नेते अयाझ सादीक आणि पंतप्रधान इम्रानखान यांचे निकटचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे मंत्री फवाद चौधरी यांच्या दरम्यान पुलवामा हल्ला आणि बालाकोट घटनेवरुन अशीच राजकीय वादावादी झडली. संसदेसारख्या अधिकृत स्थानावरुन फवाद चौधरी यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तान आणि पंतप्रधान इम्रानखान या दोघांनाही सपशेल उघडे पाडले. पाकिस्तान हा दहशतवाद पुरस्कृत करणारा देश असल्याचा ढळढळीत पुरावा त्यांनी संसदेसमोर मांडला. ‘आम्ही हिंदुस्थानला घरात घुसून मारले. पुलवामा हल्ल्याचे श्रेय हे पंतप्रधान इम्रानखान यांना दिले पाहिजे. इम्रानखान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचे हे यश आहे.’ आदी विधाने फवाद चौधरी यांनी केली. गतवर्षी फेब्रुवारीमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 40 जवांनाचा बळी गेला होता. त्यावेळी पाकिस्तानने विश्वामित्री पवित्रा घेतला होता. पाकिस्तानने डिवचल्यानंतर भारतानेही पाकच्या हद्दीत घुसून त्यांची नांगी ठेचली होती. देशविरोधी कारवाया आणि दहशतवादी हल्ल्यांचा सखोल तपास राष्ट्रीय अन्वेषण संस्थेमार्फत (एनआयए) केला जातो. पाकपुरस्कृत पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे आरोपपत्र दाखल करताना एनआयएने पाकस्थित आंतरराष्ट्रीय दहशतवादी मौलान मसूद अजहर आणि पाकिस्तानी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या विरोधात ढीगभर पुरावे सादर केले आहेत. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सांबा मार्गावरुन घुसखोरी करत पुलवामा हल्ला कसा केला, मसूद अजहरच्या नेतृत्वाखाली पूर्ण षड्यंत्र पाकिस्तानमध्ये कसे शिजले, या हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहर कसा आहे, हे स्पष्ट करणारे डिजिटल, फॉरेन्सिक आणि कागदोपत्री पुरावे सादर केले आहेत. दहशतवाद्यांना छुपा अर्थपुरवठा कसा केला गेला, याचीही माहिती दिली गेली. या पार्श्वभूमीवर पुलवामा हल्ला आम्हीच केला असे पाकिस्तानमधील जबाबदार मंत्री संसदेमध्ये कबूल करत असतील तर ती अतिशय चांगली बाब असून या कबूलनाम्याचे स्वागतच करायला हवे. यामुळे एनआयएने पाकिस्तानविरोधात दाखल केलेल्या पुराव्यांना बळकटी येणार आहे. अवैध मार्गाने मिळवलेल्या पैशाचा गैरवापर आणि दहशतवाद्यांना छुपा अर्थपुरवठा करणाऱयांना पायबंद घालण्यासाठी फायनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ही आंतरराष्ट्रीय संस्था काम करते. या संस्थेच्या ग्रे लिस्टमध्ये गेली काही वर्षे पाकिस्तानचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांचे हे स्थान कायम ठेवले आहे. दहशतवादाला बळ, दहशतवाद्यांना छुपा अर्थपुरवठा व दहशतवादाकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहणे आदी आरोप पाकिस्तानवर आहेत. दहशतवादी हल्ला हा पाकपुरस्कृत होता, या अर्थाचे विधान करणाऱया पाकिस्तानी मंत्र्याच्या वक्तव्याचा आधार घेऊन पाकिस्तानला एफएटीएफच्या ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यास भारताने कंबर कसायला हवी, असा दबाव वाढत आहे. ब्लॅकलिस्टमध्ये गेल्यास अगोदरच कर्जाच्या बोज्याने कंगाल बनलेल्या पाकिस्तानचे आर्थिक कंबरडे मोडेल. शिवाय पाकिस्तानमधील पै अन पैचा हिशोब या यंत्रणेमार्फत तपासला जाईल. या निमित्ताने दहशतवाद पोसण्यासाठी व दहशतवादी तयार करण्यासाठी अवैध मार्गाने मिळवलेला जो पैसा पाकिस्तान वापरते त्याला आळा बसेल. पाकिस्तान किती लबाड आहे हे एफएटीएफला चांगलेच माहीत आहे. त्यांनी घेतलेल्या ठळक आक्षेपांवर आजही पाकिस्तानला समाधानकारक उत्तरे देता आलेली नाहीत. ते आक्षेप म्हणजे आंतरराष्ट्रीय दहशतवादी मौलाना मसूद अजहर, लष्कर ए तोयबाचा हाफिज सईद आणि कमांडर लखवी यांच्याविरोधात पाकिस्तानने अद्यापही ठोस कृती केलेली नाही. उलट त्यांना ‘राजाश्रय’ दिला आहे. दुसरा आक्षेप म्हणजे दहशतवादविरोधी कायद्यानुसार पाकिस्तानने 7600 अतिरेक्यांची पहिली यादी दिली होती. त्यातून अचानकपणे 4 हजार अतिरेक्यांची नावे गायब झाल्याचे लक्षात आले आहे. एफएटीएफचे सध्या 39 सदस्य आहेत. ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी केवळ 12 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. तो देखील पाकिस्तानला मिळत नाही. कारण पाकिस्तान हे विश्वासार्ह राष्ट्र नाही, याची कल्पना सदस्य राष्ट्रांना आहे. ग्रे शिक्का असल्यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, आशियाई विकास बँक आणि युरोपियन संघाकडून आर्थिक सहकार्य मिळत नाही. पाकिस्तान संसदेतील विरोधी पक्षनेते अयाझ सादीक यांच्या गौप्यस्फोटामुळे उसने अवसान आणून गुरगुरणाऱया पाकिस्तानचा बुरखा गळून पडला. बालाकोट हल्ल्यादरम्यानच्या संघर्षात भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तान लष्कराच्या तावडीत सापडले होते. त्यावेळी त्यांच्या सुटकेसाठी इस्लामाबादमध्ये घडलेल्या भयभीत नाटय़ाचा वृत्तांत देऊन त्यांनी घरचा अहेर दिला. त्यांनी सांगितले की अभिनंदन यांच्या सुटकेबाबत झालेल्या बैठकीस परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी उपस्थित होते. पंतप्रधान इम्रान खान यांनी याकडे पाठ फिरवली. लष्करप्रमुख जनरल बाजवा बैठकीस आले त्यावेळी ते घामाने डबडबलेले होते. भीतीने त्यांचे पाय कापत होते. अभिनंदन यांची सुटका केली नाही तर भारत हल्ला करेल, अशी भीती कुरेशी यांनी व्यक्त केल्यानंतर अभिनंदन यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला. अयाझ सादीक यांनी इम्रानखान सरकारवर हा आरोप करताच चिडून प्रतिक्रिया देताना फवाद चौधरी यांच्या तोंडून नकळतपणे सत्य बाहेर पडले. वास्तविक, पुलवामा हल्ला झाल्यानंतर नक्राश्रू ढाळत पंतप्रधान इम्रान खान यांनी दु:ख व्यक्त करताना म्हटले होते की, पाकिस्तान असे का करेल, याचा पाकिस्तानला काय फायदा? फवाद चौधरी यांनी फुशारकी मारण्याच्या नादात आपल्याच पंतप्रधानाला तोंडावर आपटले हे मात्र निश्चित.
Previous Articleआदिकवी महर्षी वाल्मिकी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment