प्रतिनिधी/ बेळगाव
घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणरायाला शनिवारी पाचव्या दिवशी निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनासाठी रेल्वेओव्हरब्रिज येथील जक्कीनहोंड तलावाजवळ भाविकांची गर्दी झाली होती. यापूर्वी दीड दिवसाच्या गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे. गणरायाची स्थापना झाल्यानंतर दीड दिवस, पाचव्या तसेच सातव्या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते. यानुसार काही भक्तांनी शनिवारी पाच दिवसांच्या गणरायांना निरोप दिला.
पाचव्या दिवशी सायंकाळी विधिवत पूजा केल्यानंतर अबालवृद्धांनी भक्तीपूर्ण वातावरणात निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या घोषणांमध्ये बाप्पांचे विसर्जन झाले. मनपाने सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी तलावांची स्वच्छता करून सज्ज केले आहेत. कपिलेश्वर तलाव, अनगोळ, वडगाव, जक्कीनहोंड यासह उपनगरांमध्ये असलेल्या तलावांमध्ये पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला.
गणेशभक्तांनी आपल्या कुटुंबासमवेत मोठ्या भक्तिभावाने बाप्पांना निरोप दिला. मोठ्या श्रद्धेने मंगळवारी गणेश चतुदर्शी दिवशी लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना झाली होती. जड अंत:करणाने शनिवारी पाच दिवसांच्या बाप्पांना विसर्जित करण्यात आले.