प्रतिनिधी/ नवारस्ता
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली असल्याने धरण पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱया पावसामुळे धरणात प्रतिसेकंद 57 हजार 808 क्युसेक इतक्या पाण्याची आवक सुरू झाली. त्यामुळे कोयना धरण सोमवारी सायंकाळी पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी सायंकाळी उशिरा धरणाचे सहा वक्र दरवाजे सव्वा पाच फूट उचलून धरणातून प्रतिसेकंद 49 हजार 927 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. विसर्ग सुरू असला तरी गतवेळेप्रमाणे यावेळी पुराचा धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे.
धरणातून कोयना नदीत सुरू असलेल्या प्रचंड विसर्गामुळे कोयना नदी दुथडी भरून वाहू लागली असून नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचे जोरदार दमदार पुनरागमन झाले असल्याने शुक्रवारी गणेश चतुर्थीदिवशीच कोयना धरणाच्या पाणीसाठय़ाने शंभरी ओलांडली आणि धरणातील पाणीपातळी नियंत्रणासाठी रविवारपासून धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढतच असल्याने विसर्ग सुरू असतानाही धरणात मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवक सुरूच आहे. त्यामुळे 105 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे कोयना धरण सोमवारी सायंकाळी पूर्ण क्षमतेने भरले. परिणामी धरणातील पाणीपातळी नियंत्रणासाठी पुन्हा सोमवारी सकाळी 11 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे 4 फुटांनी उघडून सांडवा आणि पायथा वीजगृह असे मिळून एकूण 38 हजार 631 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला. दुपार नंतर पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झाल्याने सायंकाळी पाच वाजता धरणाचे दरवाजे 5 फूट 9 इंच इतके उचलण्यात येऊन 45 हजार 374 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झाल्याने धरणात येणारी आवक प्रतिसेकंद 57 हजार 808 क्युसेक सुरू झाली. परिणामी धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सायंकाळी सात वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे 5.3 फुटांवर करून त्यामधून 49 हजार 935 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
दरम्यान, कोयना धरणातून सुरू असलेल्या प्रचंड विसर्गामुळे कोयना नदी दुथडी भरून वाहू लागली असून कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयनानगर येथे 37 (4084) नवजा येथे 44 (5365) आणि महाबळेश्वर येथे 69 (5453) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत कोयना धरणात 75 हजार 468 प्रतिसेकंद क्युसेक पाण्याची आवक सुरू असून धरणातील पाणीसाठा सायंकाळी उशिरापर्यंत 105 टीएमसी झाला आहे तर धरणाची पाणीपातळी 2163.03 फूट इतकी झाली आहे.
धरणात पाणी मावेना..!
पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे कोयना धरण सध्या काठोकाठ भरले असल्याने येणारे पाणी मावेना अशी अवस्था निर्माण झाली आहे. मात्र पाणीसाठय़ात येणारी आवक आणि धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न कोयना सिंचन विभागाकडून करण्यात येत आहे.