प्रतिनिधी/ सातारा
शनिवारी सातारा पालिकेतल्या सभापतीपदाच्या निवडी पार पडल्या. निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, परंतु सोमवारी त्या सभापतींचा पहिला दिवस असल्याने सकाळपासूनच सभापती आपल्या केबीनमध्ये हजर होते. त्यांचे कार्यकर्ते हारतुरे आणि माजी सभापतींही पेढे, गुलाबाची फुले घेवून त्यांचे स्वागत करत होते. नियोजित कामाबाबत कर्मचाऱयांकडून आढावा घेत होते. सगळेच चित्र आनंदमयी, उल्हासीत असेच दिसत होते.
साताऱयात साविआचे नेते उदयनराजे यांच्या सूचनेनुसार सभापती निवडीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्या कार्यक्रमानंतर पहिलाच दिवस सोमवारी आल्याने सोमवारी सकाळीच भाजपाचे बांधकाम सभापती मिलिंद काटवटे वगळता सर्वच सभापती हजर होते. पाणी पुरवठा सभापती यदूनाथ नारकर हे तर त्यांचे मित्र नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे यांच्यासोबतच त्यांच्या केबीनमध्ये व्यस्त होते. माजी सभापती श्रीकांत आंबेकर यांनी त्यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच नारकर यांनी पाणी पुरवठय़ाचे नियोजन कसे करता येईल, कोणाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेता येईल याबाबत अभियंता द्विग्विजय गाढवे यांच्याशी चर्चा केली. तर माजी आरोग्य सभापती विशाल जाधव यांनीही पेढा नारकर यांना भरवला व स्वागत केले.