भोजराजाबद्दल आपण मागे समस्यापूर्तीच्या लेखात वाचले आहे. हा प्रकार वाचकांना फारच आवडत आहे, हे लक्षात घेऊन आजही काही समस्या आणि त्यांची उत्तरे आपण पाहू.
एकदा भोजराजा वेष पालटून हिंडत असता,त्याला एका घराच्या उघडय़ा खिडकीतून एक दृश्य दिसले की, एक पती पत्नीच्या मांडीवर डोके ठेवून गाढ झोपला होता. तिचे मूल रांगत रांगत जवळच्या होमकुंडाजवळ गेले व त्या पेटत्या होमकुंडात पडले. पण त्या पतिव्रतेने ते दिसत असूनही पतीची झोपमोड होऊ नये म्हणून काही हालचाल केली नाही. थोडय़ा वेळाने पती जागा झाल्यावर तिने मुलाला धावत जाऊन उचलले. तेव्हा तिचे पातिव्रत्य पाहून अग्निदेव आपणहून शांत झाला. राजाला आश्चर्य वाटले. त्याला एक समस्या सुचली. हुताशनश्चंदनपंकशीतल:। त्याने ती कविना सांगितली. पण कालिदासानेच ती पूर्ण केली.
सुतं पतन्तं प्रसमीक्ष्य पावके । न बोधयामास पतिं पतिव्रता।
तदाएभवत्तत्पतिभक्तिगौरवात्।हुताशनश्चंदनपंकशीतल:।।
अर्थ:- अग्नीमध्ये मुलगा पडत असताना पाहूनही त्या पतिव्रतेने पतीस जागे केले नाही. तेव्हा तिच्या पतिभक्तिगौरवासाठी अग्नी चंदनाप्रमाणे शीतल झाला.
आणखी एक अशीच समस्या आहे. जिचा अर्थ चमत्कारिक वाटतो. पुरा पत्यु: कामात् श्वशुरमालिङ्गति सती। म्हणजे पूर्वी एका सतीने नवऱयाच्या देखत सासऱयाला आलिंगन दिले! विचित्र वाटतंय ना? पण एका कवीने हे समस्यापूर्तीचे आह्वान स्वीकारले. त्याने लिहिले-
कदाचित् पांचाली विपिनभुवि भीमेन बहुश:
कृशांगी श्रान्ताएसि क्षणमिह निषीदेति गदिता।
शनैः शीतच्छायां तटविटपिनं प्राप्य मुदिता
पुरः पत्युः कामात् श्वशुरमालिङ्गति सती।।
अर्थ:- एकदा वनवासात असताना थकलेल्या द्रौपदीला भीम म्हणाला, हे कृशांगी, तू दमलीस. क्षणभर इथे बैस. असे म्हटल्यावर द्रौपदी आनंदाने त्या झाडाखाली शीत सावलीत बसून नवऱयादेखत सासऱयाला आलिंगन देऊ लागली. इथे द्रौपदीचा नवरा म्हणजे भीम. तो वायुपुत्र. म्हणजेच द्रौपदीचा सासरा वायू- वारा होय. द्रौपदी झाडाखाली बसून अंगावर वारा घेऊ लागली. म्हणजे जणू आपल्या पतिच्या देखत ती सासऱयाला आलिंगन देऊ लागली असा अर्थ कविने त्यातून काढला आहे!
आता यानंतरची समस्या आहे शतचंद्रनभस्तलम्। अर्थात आकाशात शेकडो चंद्र दिसले. श्लोक असा आहे-
गङ्गायाः चञ्चलतरे वारिणि प्रतिबिम्बतिम्।
शोभते तारकायुक्तं शतचंद्रनभस्तलम्।।
पहा समस्येचा अर्थ लावता येतो का?