बेळगाव शैक्षणिक जिल्हयाचा निकाल 67.36 टक्के
प्रतिनिधी / बेळगाव
दहावी परीक्षेचा निकाल कमी लागल्याने पुरवणी परीक्षार्थींची संख्या वाढली होती. मात्र 2019-2020 या शैक्षणिक वर्षातील पुरवणी परीक्षेचा निकाल देखील घसरला असून यामुळे बेळगाव शैक्षणिक जिल्हयाच्या एसएसएलसीच्या वाटचालीवर विचारमंथन करण्याची गरज आहे. पुरवणी परीक्षेचा जिल्हयाचा निकाल 67.36 टक्के लागला असून यामुळे जिल्हा पुन्हा ‘ढ’ ठरला आहे. जिल्हयातून परीक्षेला 11 हजार 669 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 7 हजार 861 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून अनुत्तीर्णांची संख्या 3 हजार 758 इतकी आहे.
कोरोनाच्या धास्तीमुळे एसएसएलसीची परीक्षा तीन महिने लांबणीवर पडली होती. परिणामी दहावीचा निकाल घसरुन जिल्हा क शेणीत होता. यामुळे पुरवणी परीक्षार्थींची संख्या वाढली होती. जून महिन्यात होणारी पुरवणी परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्यात आली. यंदा प्रथमच 10 हजारहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. नुकताच पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून जिल्हयातून पुन्हा 3 हजार 758 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यामुळे कोरोनाच्या काळात दहावीच्या निकालावर मोठा परिणाम झाला असून शिक्षण विभागासमोर एसएसएलसी बाबतचे आव्हान आहे.
विभागनिहाय निकालाच्या टककेवारीत बेळगाव शहराची पुन्हा घसरण झाली असून निकाल 54.41 टकके इतका आहे. तर त्यातुलनेत बेळगाव ग्रामीणचा निकाल समाधानकारक असून 86.39 टकके इतका निकाल लागला आहे. निकाल वाढीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची गुगलमीट घेण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी आणि यासाठीचे अडथळे यामुळे पुरवणी परीक्षेच्या निकालात देखील घसरणच झाली आहे.