कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे
पंचगंगा नदी किंवा रंकाळा तलावातील मासे मृत झाले की पाणी प्रदूषणाची चर्चा होते.राजकीय व सामाजिक संघटनाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर मोर्चे,आंदोलने केली जाते.त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दूषित पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवल्याचे सांगितले जाते.दूषित पाण्याचे नमुने आणि प्रयोगशाळेत पाठवणे हे वाक्य नागरिक गेल्या अनेक वर्षापासून ऐकत आले आहेत.पण त्यानंतर पुढे काय होते हे आजपर्यंत स्पष्ट झाले नाही.यामुळे दूषित पाण्याचे सॅम्पल म्हणजे चेष्टेचा विषय झाला आहे अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
पंचगंगा नदी आणि रंकाळा तलावातील पाण्याचे प्रदूषण हा प्रश्न कोल्हापूरला नवीन नाही. वर्षातून अनेकवेळा या दोन्ही जलस्त्रोतांचे प्रदूषण होते. प्रदूषणामुळे पाण्याला दुर्गंधी येते. पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्यास मासे आणि अन्य जलचर मृत्यूमुखी पडतात. प्रदूषणामुळे पंचगंगा नदीच्या पूर्वेकडील भागात कावीळीसारख्या साथीचे आजार उद्भवतात. यामुळे राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून मोठा गदारोळ होतो.त्याप्रमाणे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर आंदोलन, मोर्चा ठरलेला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयांना आरोपीच्या पिंजऱयात उभा करुन त्यांना जाब विचारला जातो.यानंतर प्रदूषण मंडळाकडून कायदेशीर प्रक्रिया म्हणून प्रदूषित पाण्याचे नमुने घेऊन ते चिपळूणच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातात. आणि प्रयोगशाळेतून अहवाल आल्यावर संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले मिळते. गेली काही वर्षे हा प्रकार सुरु आहे. पण पंचगंगा नदी किंवा रंकाळा तलावाचे प्रदूषण अजूनतरी थांबले नाही. यामुळे प्रदूषित पाण्याचे नमुने घेणे म्हणजे चेष्टेचा विषय झाला आहे अशी नागरिकांतून चर्चा होत आहे.
काय आहे प्रदूषित पाणी तपासणीची प्रक्रिया
रत्नागिरी जिल्ह्य़ातील चिपळूण येथे प्रदूषित पाण्याचे नमुने घेऊन त्याचे पृथ्थकरण करणारी प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत कोल्हापूरसह पाच जिल्हय़ातील नमुने येतात. यामुळे पृथ्थकरणासाठी किमान पंधरा दिवस ते महिन्याचा कालावधी लागतो. कोल्हापूरातून आठवडय़ातून एकदा म्हणजे प्रत्येक सोमवारी घेतलेल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले जातात. अडीच लीटरच्या कॅनमधून पाणी पाठवले जातात. प्रयोगशाळेतही पाण्याच्या प्रमाणानुसार वर्गीकरण केले जाते. यामुळे पृथ्थकरण होऊन त्याचा अहवाल येण्यासाठी वेळ लागतो. तोपर्यंत सर्वांनाचा प्रदूषणाचा विसर पडलेला असतो.
मानकापेक्षा अधिक प्रदूषण असल्यास कारवाई
चिपळूण येथील प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाल्यावर प्रदूषणाचे मानक किती आहे ते स्पष्ट होते. तो अहवाल मुंबईतील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला पाठवला जातो. मानकापेक्षा अधिक प्रदूषण असल्यास मुंबई कार्यालयाकडून कारवाईचे आदेश दिले जातात. त्याप्रमाणे प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पुढील कारवाई होते. त्यापैकी बँक गॅरंटी जप्तीची कारवाई आहे. अशा प्रकारची कारवाई महापालिकेसह अनेकांवर करण्यात आली आहे. पण अशा प्रकारच्या कारवाईने प्रदूषण थांबत नाही हे दुर्देव आहे.