हिंसाचारावर स्पष्टीकरणासाठी मुख्य सचिवांना पाचारण
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे राज्यपाल जगदीप धनखड व्यथित झाले असून त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना स्पष्टीकरण देण्यासाठी पाचारण केले आहे. हा हिंसाचार सत्ताधारी तृणमूल काँगेस पक्षाच्या गुंडांकडून होत असून राज्यात अराजकाची स्थिती आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे.
यासंदर्भात राज्यपालांनी रविवारी ट्विटरवरून त्यांची भूमिका मांडली. राज्यातील कायदा-सुव्यवस्था परिस्थिती अतिशय बिघडली आहे. अक्षरशः लाखो लोकांना विस्थापित होण्यास भाग पाडले जात आहे. ज्यांनी निवडणुकीत भाजपला सहकार्य केल्याचा संशय आहे, त्यांना लक्ष्य केले जात असून त्यांना राज्यात राहणे अशक्य करून सोडणे हा सत्ताधारी पक्षाच्या गुंडांचा हेतू स्पष्ट दिसत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारकडून कोणती उपाय योजना केली जात आहे, याचे स्पष्टीकरण राज्याच्या सचिवांनी करावे, असा आदेश राज्यपालांनी दिला.
गुंडांच्या पाया पडण्याची वेळ
तृणमूल काँगेसला ज्यांनी मत दिले नाही, त्यांना राज्यात सुरक्षितपणे राहण्यासाठी सत्ताधारी पक्षांच्या गुंडांच्या पाया पडून दयेची भीक मागावी लागते, अशा असंख्य तक्रारी राज्यपालांकडे आल्या आहेत. ही स्थिती अभूतपूर्व आणि कल्पनातीत आहे. देशभरात कोठेही असे घडलेले नाही. राज्य सरकारचे स्थितीवर नियंत्रण असल्याचे दिसत नाही. विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांची घरे जाळणे, मालमत्तांची हानी करणे, त्यांना धमकावणे, त्यांची लूट करणे हे प्रकार नित्याचेच झाले असून निवडणूक होऊन एक महिना झाला तरी हा हिंसाचार थांबलेला नाही असे अनेक आरोप राज्यपालांनी लेखी पत्रात केले आहेत.
पोलीस सत्ताधाऱयांचे हस्तक ?
पश्चिम बंगालमधील पोलीस सत्ताधाऱयांसमोर हतबल झाले असून हिंसाचार रोखण्यासाठी ते कोणतीही कारवाई करीत नाहीत, असे दिसते. सत्ताधाऱयांच्या सूडभावनेच्या कृतीत त्यांचाही मूक सहभाग आहे. याचाच अर्थ राज्यातील स्थिती चिंताजनक असून मुख्य सचिवांनी 7 जूनला स्वतः उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे, अशी सूचना राज्यपालांनी केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुढचे तीन ते चार दिवस अत्यंत महत्वाचे आहेत, असे तज्ञांचे मत आहे.